Home Sports Nagpur Sports News । वेळा (हरिश्चंद्र) येथे क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते अचिव्हर्स बॅडमिंटन...

Nagpur Sports News । वेळा (हरिश्चंद्र) येथे क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते अचिव्हर्स बॅडमिंटन क्लबचे थाटात उद्घाटन

571
नागपूर ब्युरो : आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला सहभागी व्हावे असे वाटते. त्यामुळे त्याच्यावर प्रचंड ताण – तणाव येत असतो. त्यामुळे आपल्याला आपले आरोग्य शारीरिक तथा मानसिक दृष्ट्या निरोगी ठेवण्याकरिता किंवा विरंगुळा मिळण्याकरिता आयुष्यात खेळाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग तो खेळ इनडोअर असो किंवा आऊटडोअर. अशाच एका ध्येयवेड्या तरुणाने आपल्या जिद्दीच्या आणि परिश्रमाच्या बळावर आज वेळा (हरिश्चंद्र), बेस रोड, नागपूर येथे सुसज्जित, प्रशस्त बॅडमिंटन कोर्टचे निर्माण केले. त्या तरुणाचे नाव आहे संजय दोनोडे.

बालपणापासून खेळण्याचा छंद असलेल्या या तरुणाने बऱ्याच स्पर्धेमध्ये पारितोषिके पटकाविले. नंतर बॅडमिंटनमध्ये रुची असल्यामुळे तो त्या खेळाचा सराव करत गेला. कधी पटांगणात तर कधी बगिच्यात, पण एकदा त्याला या सरावासाठी लोकांकडून मज्जाव करण्यात आला. त्याला हाकलून लावण्यात आले. त्या क्षणापासून संजयने ठरविले की मी एक असे स्थान निर्माण करेन की ज्याचा उपयोग समाजातील प्रत्येक घटकाला करता येईल.

या उदात्त भावनेतून त्याने श्री स्वामी समर्थ स्पोर्ट्स अंड वेल्फेअर असोसिएशनची स्थापना केली आणि मागील दोन वर्षांपासून सातत्याने आणि परिश्रमाने अचिव्हर्स बॅडमिंटन क्लब या भव्य वास्तूचे निर्माण केले. येथे योगा, प्राणायाम, झुंबा डान्स इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते. आज याच वास्तू चा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात आयोजित करण्यात आला होता. राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार, रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

 

याप्रसंगी मंगेश काशीकर, जिल्हा परिषद सदस्य मेघा मानकर, जिल्हा क्रीडा अधिकारी पुंड, वेळा (हरिश्चंद्र) गट ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन इंगळे, बेसा – बेलतरोडी चे सरपंच सुरेंद्र बानाईत, स्वामी समर्थ स्पोर्ट्स वेल्फेअर चे अध्यक्ष अजय दोनोडे, उपाध्यक्ष संजय चरडे, क्लब चे संचालक सौरभ हेमने, सविता हेमने, स्वामी धाम बेसा चे अध्यक्ष दिनकर कडू, वास्तूचे शिल्पकार रुपेश कारेमोरे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंगेश काशीकर यांनी या सुंदर आणि भव्य वास्तूच्या निर्माणा बद्दल संजय दोनोडे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच क्रीडा मंत्र्यांना या परिसरामध्ये प्रशस्त क्रीडा संकुलाचे निर्माण करावे व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन या ठिकाणी करण्यात यावे अशी विनंती देखील करण्यात आली.

खासदार कृपाल तुमाने क्लबच्या आयोजकांचे कौतुक करताना म्हणाले की मी पहिल्यांदाच ग्रामीण भागात इतके भव्य आणि सर्व सोयीयुक्त बॅडमिंटन क्लब बघितले. भविष्यात यथा संभव मदत आणि अर्थसहाय्य करण्याचे त्यांनी आश्वासन सुद्धा दिले. क्रीडामंत्री यांचे लक्ष वेधून घेत असताना तूमाने म्हणाले ग्रामीण भागामध्ये सध्या एनएमआरडीए च्या माध्यमातून परिसराचा विकास कार्याचे काम सुरू आहे. आता या परिसरामध्ये भरपूर प्रमाणात मोकळी जागा असून ती शासकीय कामासाठी आरक्षित करून तिथे मोठे भव्य इंडोर स्टेडीयम मानकापूर च्या धर्तीवर करता येऊ शकते. त्यामुळे येथील नागरिकांना याचा फायदा होईल आणि दोनोडे सारख्या लोकांवर खेळाडू तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात यावी असेही ते म्हणाले.

राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की मी राज्यात बरेच दौरे केले. क्रीडा संकुलाचे, क्लब हाऊसचे उद्घाटन देखील केले. मात्र मी आज येथे प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की ग्रामीण भागामध्ये बॅडमिंटन क्लब ची संकल्पना करणे व ती साकार करणे हे खरोखर जिकरीचे काम आहे. त्यामुळे मी संजय दोनोडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो. खेळाची व्याख्या खूप मोठी आहे. ती शारीरिक – मानसिक सर्वसमावेशक भेदभाव नसलेली आहे. मानवाच्या विकासात खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आपल्या देशातील ऑलिंपिक स्पर्धेतील यावर्षीच्या विजेत्यांनी हे दाखवून दिले आहे की जिद्द, परिश्रम, सातत्य आणि सरावाने आपण कोणतीही स्पर्धा जिंकू शकतो. ते आपल्यासाठी प्रेरणादायक आहेत. आम्ही पुण्याला आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स अकादमी सुरू केली आहे. भविष्यात इथे देखील त्याच धर्तीवर स्पोर्ट्स अकादमी सुरू करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. त्यांनी आयोजकांना सल्ला दिला की चारिटी करू नका. त्यामुळे प्रशिक्षणाला महत्त्व नसते. आमच्या मंत्रालयाच्या माध्यमातून आपल्या बॅडमिंटन क्लबला आवश्यक ती मदत करू, असेही केदार यावेळी म्हणाले. 12 जानेवारी 2022 मध्ये आम्ही नागपुरात इंटरनॅशनल युथ फेस्टिवल चे आयोजन करणार आहोत. त्यात युवकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा अशी माहिती देखील याप्रसंगी केदार यांनी दिली.