नागपूर ब्युरो : कोळश्याच्या टंचाईमुळे राज्य अंधारात जाण्याची वेळ आली आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. सरकार आणि वीज पुरवठा करणाऱ्या तिन्ही कंपन्यांमध्ये काहीच ताळमेळ नसल्यानंच राज्यावर ही वेळ आल्याचा गौप्यस्फोट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गौप्यस्फोट केला आहे. 2800 कोटी रुपये कोळशाचे थकीत असल्याने महाराष्ट्रावर अंधारात जाण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारचा तिन्ही कंपन्यांशी ताळमेळ नाही. कोळसा लिफ्टींगची परवानगी न दिल्याने ही वेळ राज्यावर आली आहे. ऊर्जा विभागाने कोळशाचे योग्य नियोजन केलं नाही. कोळशाचा पुरेसा साठा न केल्याने ही वेळ आली आहे. महाजनकोकडे कंत्राटी कामगारांचे पगार द्यायला पैसे नाही. गरज भासल्यास मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांनी महाजेनकोला 4-5 हजार कोटी द्यावे, कर्ज घ्यावं, असा सल्ला बावनकुळे यांनी दिला आहे.
आमचं सरकार असतं तर दिल्लीत जाऊन बसलो असतो
आमचं सरकार असतं तर तातडीने 2800 कोटी रुपये दिले असते. दिल्लीत जाऊन बसलो असतो आणि कोळसा मिळवला असता. आमचं सरकार असतं तर ही वेळ आली नसती. शेतकऱ्यांना वीज दिल्याने कधीही वीज कंपनी घाट्यात येत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
ग्रामीण भागात होत आहे लोडशेडिंग
महाजेनकोकडे दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा आहे, कोळशाअभावी वीजनिर्मितीचे राज्यात 13-13 संच बंद झाले आहेत. ग्रामीण भागात लोडशेडिंग सुरु झालंय… संपूर्ण राज्य काळोखात जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. ऊर्जा विभागाने योग्य नियोजन न केल्याने ही वेळ आलीय, असं ते म्हणाले.
कोळसा टंचाईचे संकट । विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणचे शर्थीचे प्रयत्न सुरु