नागपूर ब्युरो : दीक्षाभूमीवर 65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. दीक्षाभूमीवर तब्बल 2500 पोलीस तौनात करण्यात आले आहेत. ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. मात्र, कोरोनामुळे शुक्रवारी धम्मदीक्षा सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम रद्द करण्यात आल्यामुळे सचिव धम्मपाल मेश्राम यांनी नाराजी व्यक्त केलीय. महाविकास आघाडी सरकारने मुद्दामहून हा सोहळा रद्द केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मुख्य कार्यक्रम मुद्दामहून रद्द केला
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दसऱ्याच्या दिवशी नागपुरात बौद्ध अनुयायी मोठ्या प्रमाणात जमतात. लाखोंच्या संख्येने लोक येण्याची शक्यता असल्यामुळे येथे गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. याच कारणामुळे येथील सर्व सोहळे रद्द करण्यात आला आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन अगदी साध्या पद्धतीत साजरा करण्यात येणार आहे. तसे निर्देश राज्य सरकारने दिलेले आहेत. मात्र, राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयावर भाजपने आक्षेप नोंदवला आहे. भाजपचे सचिव धम्मपाल मेश्राम यांनी नाराजी व्यक्त केली असून महाविकास आघाडी सरकारने मुद्दामहून हा सोहळा रद्द केला आहे, असा आरोप केला आहे.
साध्या पद्धतीनं सोहळ्याचं आयोजन
नागपूरच्या दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. अनुयायांना या ठिकाणी येऊन नतमस्तक होता येणार नाही. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे दरवर्षी दसर्याला दीक्षाभूमीवर आयोजित होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याचे आयोजन या वर्षी करता येणार नाही. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. तेव्हापासून दसऱ्याच्या दिवशी लाखो अनुयायी या सोहळ्याला हजेरी लावतात.
निर्णय का घेण्यात आला?
राज्य शासनाने धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी मोठ्या संख्येने भाविक एकत्रित येण्याच्या कार्यक्रमांना प्रतिबंधित केले आहे. नागपूर दीक्षाभूमी येथे 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये येणाऱ्या अनुयायांची संख्या लाखोमध्ये राहणार असून या ठिकाणी राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे कोविड- 19 चा प्रोटोकॉल पाळणे शक्य नसल्याचे सर्व संस्था व विभागाचे मत आहे. त्यामुळे यावर्षी अभिवादन सोहळा होऊ शकणार नाही, असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन घेतला निर्णय
जिल्हा प्रशासनाने नागपूर दीक्षाभूमीवर आयोजन करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पल कामठी अध्यक्षांशी 30 सप्टेंबरला बैठक घेतली. राज्य शासनाच्या दिशानिर्देशानुसार मोठ्या प्रमाणात गर्दी टाळण्याबाबतची सूचना केली. तसेच नागपूर महानगरपालिका, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग व अन्य प्रमुख विभागाशीही या संदर्भात चर्चा केली होती. सर्वांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
ब्रेक द चैन अंतर्गत निर्णय
नागपूर येथे दीक्षाभूमीवर यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याचे आयोजन होणार नाही. शासनाच्या ब्रेक द चेन 4 (XV ) निर्देशातंर्गत नागपूर जिल्हा प्रशासनानं हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळं दरवर्षी दसर्याला दीक्षाभूमीवर आयोजित होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याचे आयोजन या वर्षी करता येणार नाही. मुख्य म्हणजे मागील वर्षी सुद्धा हा सोहळा मोठ्याप्रमाणात होऊ शकला नव्हता.
Nagpur News । यंदाही नागपूरच्या दीक्षाभूमीवर उसळणार नाही निळा जनसागर