Home CRPF #Maha_Metro | सीताबर्डी मेट्रो स्थानकावर पोलीस दिनानिमित्त शहीद पोलिसांना अभिवादन

#Maha_Metro | सीताबर्डी मेट्रो स्थानकावर पोलीस दिनानिमित्त शहीद पोलिसांना अभिवादन

566

नागपूर ब्युरो : समाजाची सुरक्षा करताना आपल्या प्राणाची पर्वा न करता, अनेकानेक संकटांना सामोरे जात शहिद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना श्रद्धांजलीपर अभिवादन देण्याचा कार्यक्रम आज बुधवार, 27 ऑक्टोबर ला सीताबर्डी इंटरचेंज येथे आयोजित करण्यात आला. राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) जवानांनी हा कार्यक्रम सादर केला. कर्तव्य बजावतांना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना राखीव दलाच्या जवानांसह मेट्रो कर्मचारी-अधिकारी आणि प्रवाश्यांनी देखील श्रद्धांजली वाहिली. दर वर्षी शहिद पोलीस सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम याच काळात आयोजित करण्यात येतात.

सीताबर्डी स्थानकाच्या बँड स्टॅन्डवर सादर झालेल्या या कार्यक्रमात देश भक्तीपर गीत सादर करण्यात आले. हा कार्यक्रम बघण्याकरता आणि गीत ऐकण्याकरता मेट्रो प्रवासी देखील उपस्थित होते. या सारखा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम या आधी देखील 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोबरला त्या दिवसाचे निमित्त साधून आयोजित करण्यात आले आहेत. या शिवाय नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्याकरता बँड स्टॅन्डवर संगीताचे कार्य्रक्रम या आधी आयोजित करण्यात आले आहे. आपल्या शहीद सहकाऱ्यांना श्रद्धांजली देण्याकरता या सारखे उपक्रम राज्यात अनेक ठिकाणी आयोजित होत असल्याचे एसआरपीएफ अधिकाऱ्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहिद पोलीस बांधवांना आपल्याला अभिवादन करता आल्याचे मेट्रो प्रवासी पंकज पाटील म्हणाले. समाजाचे संकट रक्षक असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांबद्दल संवेदना व्यक्त करण्याची संधी या निमित्ताने मिळाल्याचे समाधान असल्याचे कल्पना जाधव म्हणाल्यात. एसआरपीएफ कमांडेंट पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनांतर्गत उपनिरीक्षक मंगल मडावी यांनी आजचा हा कार्यक्रम सादर केला.

#Maha_Metro | आता मेट्रोत बघा खादी आणि चरख्याचे व्हीडिओ, `आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत उपक्रम