Home National #gadchiroli । दक्षिण गडचिरोलीत भूकंपाचे सौम्य धक्के, तेलंगणा सीमेवर भूकंपाचे केंद्र

#gadchiroli । दक्षिण गडचिरोलीत भूकंपाचे सौम्य धक्के, तेलंगणा सीमेवर भूकंपाचे केंद्र

548

गडचिरोली ब्युरो : जिल्ह्याच्या दक्षिण भागात प्राणहिता नदीच्या केंद्रबिंदूपासून 77 किलोमीटर खोलीसह 4.3 रिस्टर स्केलच्या भूकंपाची नोंद नॅशनल सेंटर फाॅर सिस्मोलाॅजीने केली आहे. गडचिरोली आणि तेलंगणा सीमेवर झाफराबाद चक या प्राणहिता नदीवरील केंद्राजवळ सदर भूकंपाची नोंद घेतली आहे. या भूकंपात बातमी लिहिपर्यंत कोणत्याही प्रकारची जिवीत अथवा अन्य प्रकारची हानी झाली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या कडून देण्यात आली आहे.

अहेरी येथील नागरिकांच्या मते रविवारी सायंकाळी 6 वाजून 49 मिनिटाच्या दरम्यान अचानक जमीन थरथरली आणि घरांमधील लोक भीतीपोटी बाहेर पडले. अनेकांच्या घरातील भांडी खाली पडली. हे झटके अहेरी, आलापल्ली, रेपनपल्ली, कमलापूर, जिमलगट्टा, गोविंदपूर, आष्टी, बोरी, राजाराम खांदला या गावापर्यंत जाणवले. मात्र यात कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही.

अफवा पसरवू नये : जिल्हाधिकारी

जिल्हा प्रशासनाने भूकंपाच्या संदर्भात माध्यमांनी कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये अथवा चुकीचे संदेश नागरिकांपर्यंत जाऊन ते भयभीत होऊ नये असे आवाहन केले आहे. संबंधित विभागांकडून नुकसानी संदर्भात कुठलीही माहिती प्राप्त झाल्यानंतर ती अधिकृतपणे माध्यमांना दिली जाईल असे गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी म्हटले आहे.