Home Maharashtra अमरावतीत 14 हजार जणांवर गुन्हे; भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे यांना अटक...

अमरावतीत 14 हजार जणांवर गुन्हे; भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे यांना अटक व जामिनावर सुटका

667

अमरावतीत शुक्रवार व शनिवारी झालेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १४ हजार ६७३ जणांविरुद्ध २६ गुन्हे दाखल केले आहेत. त्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू असून सोमवारी सायंकाळपर्यंत पोलिसांनी १३२ जणांना अटक केली हाेती. दरम्यान, शहरातील इंटरनेट सेवा १३ ते १५ नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्यात आली होती. मात्र आणखी एक दिवस त्यात वाढ करण्यात आल्यामुळे १६ नोव्हेंबरलाही शहरातील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय पोलिसांकडून घेण्यात आला आहे.

दरम्यान, सोमवारी सकाळीच पोलिसांनी भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे, महापौरांसह अन्य पदाधिकारी अशा एकूण १४ जणांना अटक केली होती. त्यांना सोमवारीच न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.

चौकशीचे आदेश : गृहमंत्री

त्रिपुरात घडलेल्या कथित घटनेचे निमित्त करीत रझा अकादमीने राज्यात घडवलेल्या दंगलीची चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दाेषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

निवडणुकांसाठी खटाटोप : पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, महत्त्वाच्या व्यक्तींनी त्रिपुरात तसे काही घडले नसल्याचे सांगितले आहे. समजा तिथे काही घडल्याचे आपण गृहीत धरले तरी महाराष्ट्रात ४ ठिकाणी हिंसाचार होण्याची गरज नाही. ३-४ राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे जाणीवपूर्वक केले जात आहे.

दंगलींसाठी भाजप नेते बोंडेंनी पैसे वाटले, शेलार ‘रझा’च्या कार्यालयात : मलिक

अमरावती, नांदेड, मालेगावात बंद पुकारून दंगली घडवण्यामागे भाजपचा हात आहे. दंगली घडवण्यासाठी मुंबईतून आलेले पैसे स्थानिक भाजप नेत्यांनी दंगलखोरांना पुरवले. भाजपचे माजी आमदार अनिल बोंडे यांचा अमरावती दंगलीत थेट हात असल्याचा आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी केला.

– मलिक म्हणाले, भाजप आमदार अॅड. आशिष शेलार मुंबईतील रझा अकादमीच्या कार्यालयात बसले होते. त्यांची रझा अकादमीच्या नेत्यांशी मीटिंग झाली. हा षड‌्यंत्राचा हिस्सा होता की नाही, हे माहीत नाही. मात्र, दंगल भडकवतील एवढी अकादमीची ताकद नाही. पण त्यांच्या कार्यालयात बसून शेलार हे मीटिंग करत होते. त्याचा फोटोही आहे, याची चौकशी होईल.

रझा अकादमीसोबतचे तुमचेही असंख्य फोटो दाखवू : अॅड. शेलार

मलिकांना प्रत्युत्तर देत भाजप नेते आशिष शेलार म्हणाले, ‘अशा पद्धतीने दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोंच्या जिवावर अफवांचे राजकारण करणे हा तुमचा धंदा आहे. पण त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात घडलेल्या दंगलींचा आणि सन २०१६-१७च्या फोटोचा संबंध काय?

– ही बैठक रझा अकादमीच्या कार्यालयात झालेली नाही. तुमची खोड जात नसेल तर रझा अकादमीसोबतचे असे असंख्य फोटो आम्हाला दाखवावे लागतील. तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही,’ असा इशाराच आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नबाव मलिक यांना दिला.