Home National #ConstitutionDay । विहारांपासून मदरशापर्यंत अन् गोवंडीपासून धारावीपर्यंत सुरू आहे संविधानाचा जागर

#ConstitutionDay । विहारांपासून मदरशापर्यंत अन् गोवंडीपासून धारावीपर्यंत सुरू आहे संविधानाचा जागर

599

देवनार डंपिंग ग्राउंडवर वसलेली शिवाजीनगर वस्ती. हिंदी सिनेमात दिसणाऱ्या अरुंद बोळींतून निलोफर घेऊन गेली. इलेक्शन आलंय म्हणून गटारीवर ढापे पडलेत. नाही तर उड्या मारूनच जावं लागतं गटारावरून… निलोफर सांगत होती. दोन्ही बाजूंना मिश्र धर्माची घरं दिसत होती. त्यातलाच एक मार्ग पोहोचला मदरशाकडे. एरवीच्या मदरशांपेक्षा आत पूर्ण वेगळं चित्र. मुलांच्या बरोबरीनं मुलीही अभ्यास करत होत्या आणि मौलाना मोहमत हूसेन उर्दूतून मुलांना शिकवत होते… आम्ही भारताचे लोक… २६ नोव्हेंबर १९४९ रोजी हे संविधान स्वीकारले. आज हे संविधान आपल्या देशाचा रूह आहे.. आत्मा आहे…

संविधान प्रचारक म्हणून काम करणारे मौलानाजी त्यांना झालेल्या विरोधाबद्दल सांगत होते. “लोग मजाक उडाते थे.’ आज संविधान जागर करणाऱ्या मौलवींची टीमच हे मौलानाजी तयार करत आहेत. संविधान संवर्धन समितीतर्फे देण्यात येणाऱ्या समता फेलोशिपचे ते फेलो आहेत. त्यांच्यामागोमाग मदरशातील चिमुकली मुले लयीत डुलत स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता आणि बंधुता याच्या व्याख्या उर्दूतून पाठ करत होते.

शिवाजीनगरपासून काही अंतरावर भारतनगर वस्ती होती. तिथल्या पंचशील बुद्धविहारात सविता पंडित संविधानाच्या उद्देशिकेचे आपल्या आयुष्यातील महत्त्व समजावून सांगत होत्या. जसे धर्मांमध्ये गीता, कुराण, बायबल हे ग्रंथ आहेत तसा संविधान हा आपला सर्व भारतीयांचा ग्रंथ आहे. या संविधानामुळे आपण बोलू शकतो, शिकू शकतो, काम करू शकतो, सन्मानाने व समानतेने जगू शकतो. त्यामुळे आपण संविधान समजून घेतले पाहिजे. त्यांच्या संविधान शाखेत वस्तीतल्या बच्चे कंपनीपासून तरुण, महिला साऱ्या येतात. सर्व धर्मांचे लोक जमतात. नागरिक म्हणून आपले घटनात्मक अधिकार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या समजून घेत होते. “संविधान साक्षरता पुरेशी नाही तर त्यातून लोकांचे सामूहिक नेतृत्व तयार होते.

या मूल्यांच्या आधारे लोकानी त्यांचे सामजिक-राजकीय प्रश्न तडीस नेणे व सजग नागरिक म्हणून जगणे अभिप्रेत आहे’. वाराणसीहून संविधान प्रशिक्षण कार्यशाळेतून आलेले सुरेश सावंत सांगत होते. बारा वर्षापूर्वी त्यांनी काही मित्रांसोबत सुरू केलेला संविधान जागराचा वृक्ष आज चेंबूर, गोवंडी, मालाडच्या वस्त्यांमध्ये फळू लागला आहे.

संविधान शिकता शिकता त्यातील समतेच्या मूल्यासाठी मुलींची छेडछाड थांबत आहे, वस्तीत सामजिक सलोखा व संवाद राखत धर्मनिरपेक्षतेचे मूल्य जगत आहेत. या जागरातून तयार झालेले ३ हजार संविधान प्रचारक राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले होते. कुणी संविधान कफेच्या माध्यमातून, कुणी कलापथकातून, कुणी सोशल मीडियावरून तर कुणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर होणाऱ्या संविधान यात्रेच्या तयारीत गुंतले होते… त्यात घरेलू कामगार होत्या, तरुण होते, नोकरदार होते, दुकानदार होते, शिक्षक होते, भिक्कू होते आणि मौलवीही होते. – मुमताज शेख, संविधान प्रचारक