Home Education #Maharashtra । 1 डिसेंबरपासून १ ते ७ पर्यंतच्या शाळा सुरू, एकालाही कोरोना...

#Maharashtra । 1 डिसेंबरपासून १ ते ७ पर्यंतच्या शाळा सुरू, एकालाही कोरोना झाल्यास शाळा बंद

541
राज्यात येत्या 1 डिसेंबरपासून पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी हिरवा कंदिल दिला. पालकांच्या संमतीने राज्यात काही खासगी शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. आता महापालिका आणि सर्व सरकारी शाळा देखील सुरू होणार आहेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे, स्थानिक पातळीवर कोरोनाची रुग्णसंख्या कमी झालेली असताना त्या-त्या ठिकाणी चौथीपासून पुढील वर्गांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. काही खासगी इंग्रजी शाळा पालकांच्या मंजुरीने पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलवत आहेत. तर काही शाळांनी ऑनलाइनच्या माध्यमातून वर्ग घेतले. आता शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ग्रामीण भागात पहिली ते चौथी पर्यंत आणि शहरी भागांत पहिली ते सातवी पर्यंत शाळा सुरू होणार आहेत. त्या-त्या ठिकाणी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय लागू केला असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

मंत्रिमंडळाने दिलेल्या मंजुरीमध्ये नेमके काय?
  • शाळा सुरू करण्यापूर्वी कमीत कमी 1 महिना संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.
  • शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा.
  • विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.
  • कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15-20 विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे, इ.
  • विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरू करावेत.
  • शाळा सुरू करताना मुलांना टप्प्या-टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गांना अदला-बदलीच्या दिवशी सकाळी-दुपारी, ठराविक महत्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य इ. हयासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचना (SOP) चे पालन करावे.
  • संबंधित शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.
    कोरोनाचा वेग मंदावला असला तरीही गाफील राहू नका

    दरम्यान, राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असली तरीही ती सौम्य राहील असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नुकतेच सांगितले. यासोबतच, कोरोना रुग्णांचा वेग मंदावला असला तरीही गाफील राहू नका. कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा असा सल्ला देखील आरोग्य मंत्र्यांनी दिला.