Home Covid-19 #Omicron । कठोर पावले उचलली नाहीत तर तिसरी लाट शक्य : आयएमए,...

#Omicron । कठोर पावले उचलली नाहीत तर तिसरी लाट शक्य : आयएमए, देशात 23 रुग्ण

559

आता कठोर पावले उचलली नाहीत तर कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे भारतात भयंकर तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या देशातील डॉक्टरांच्या सर्वात मोठ्या संघटनेने दिला आहे. आयएमएने माध्यमांसोबतच्या चर्चेत म्हटले की, भारतातील प्रमुख राज्यांत ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण समोर आले आहेत. त्यांची संख्या आणखी वाढू शकते.

त्यामुळे आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी आणि कमकुवत रोगप्रतिकारक्षमता असलेल्या व्यक्तींना लसीचा बूस्टर डोस देण्यात यावा, अशी केंद्र सरकारला विनंती आहे. सरकारने १२ ते १८ वर्षे वयाच्या मुलांना लस देण्याबाबतही लवकर विचार करावा, अशी मागणीही आयएमएने केली आहे. देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे २३ रुग्ण आढळले आहेत. लोकांनी गर्दीच्या मोठ्या सामाजिक कार्यक्रमांत सहभागी होऊ नये, मास्क घालावा, हात धुवावेत, कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहनही आयएमएने केले आहे.

देशातील ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या दुसऱ्या रुग्णाचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह
बंगळुरूत आढळलेल्या दुसऱ्या ओमायक्रॉन संक्रमित रुग्णात पुन्हा संसर्ग आढळला आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या या ४७ वर्षीय व्यक्तीची प्रकृती आता स्थिर आहे. तथापि, त्याचा कोरोना-१९ अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांनुसार, या व्यक्तीला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्याच्यात कुठलीही लक्षणे नाहीत.

ओमायक्रॉन आढळल्यानंतर निगेटिव्ह अहवाल दाखवून बंगळुरूहून पळून गेलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकाविरुद्ध पोलिसांनी क्वॉरंटाइन नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

बंगळुरूच्या फाइव्ह स्टार हॉटेलचे व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांविरुद्धही संक्रमित व्यक्ती गेल्याची माहिती अधिकाऱ्यांना न दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, ‘अॅट रिस्क’ देशांतून आलेल्या १० पैकी ८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. दोघांचा अहवाल बाकी आहे. ठाणे (महाराष्ट्र) कल्याण डोंबिवली भागात विदेशातून आलेल्या ३१८ पैकी १२ लोकांचा पत्ताच नाही. त्यांचे मोबाइल फोन बंद आहेत किंवा घराला कुलूप आहे.

सॅनफ्रान्सिस्कोच्या ग्लॅडस्टोन इन्स्टिट्यूचे डॉ. वार्नर ग्रीने यांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेच्या गुआतेंग प्रांतात रोज रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. त्यापैकी ७५% रुग्ण ओमायक्रॉनचे आहेत. तथापि, मृत्यूत वाढ झालेली नाही.