नागपूर ब्युरो : महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ लि., नागपूर यांनी उत्पादित केलेल्या उच्च दर्जाच्या उत्पादनांचे विशेष प्रदर्शन व विक्री गोंडवाना गॅलरी, रामदासपेठ, नागपूर येथे हॉटेल सेंट्रल पॉइंटच्या मागे आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्य वस्त्रोद्योग आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ लि. नागपूरच्या व्यवस्थापकीय संचालिका शीतल तेली-उगले यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या प्रदर्शनाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
हातमागावर बनवलेले विविध प्रकारचे कपडे प्रदर्शनात उपलब्ध आहेत. यामध्ये सिल्क, टसर करवती साड्या, पैठणी साड्या (GI प्रमाणित), सिल्क टसर ड्रेस मटेरियल, लेडीज-जेंट्स आणि लहान मुलांचे कपडे, बांबू केळी मिश्रित कापड आणि साड्या, कॉटन साड्या, स्कार्फ, स्टोल्स, दुपट्टे, टाय, दैनंदिन वापरातील चादरी, टॉवेल. बेडशीट, रग्ज इ. समावेश आहे.
शीतल तेली-उगले यांनी हातमाग प्रदर्शन सादर करून विणकरांना प्रोत्साहन देण्याचा कौल दिला आहे. या प्रदर्शनातील विक्रीमुळे विणकरांच्या रोजगारात वाढ होण्यास मदत होणार असून, शहरातील रहिवाशांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार हातमाग कापड उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी प्रदर्शनाला एकदा तरी भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. सदर प्रदर्शनी १२ डिसेंबर, रविवारी बंद होईल.
गोंडवाना गॅलरी येथे सुरू असलेल्या हात माग वस्त्र प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. या प्रदर्शनाचे अखेरचे दोन दिवस असल्याने आयोजकांनी जास्तीत जास्त संख्येने प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आव्हान केले आहे.
महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित नागपूर महा हँडलूम द्वारे गोंडवाना गॅलरी रामदास पेठ नागपूर येथे विशेष हातमाग कापड प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले असून हात माग कापड खरेदीवर 20 टक्के अधिक 10 टक्के व रेडिमेट गारमेंट्स वर 30 टक्के सूट देण्यात येत आहे.
अस्सल सिल्क व कॉटन साड्या व घरगुती वापरासाठी लागणारे चादरी, टॉवेल, नॅपकिन आणि सिल्क व कॉटन कापड खरेदीसाठी ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हातमागावर काम करणाऱ्या कुशल विणकर कारागिरांना नियमित रोजगार उपलब्ध होण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याने शेवटचे दोन दिवस प्रदर्शन सुरू राहणार आहे. नागपूरकरांनी एकदा या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी आणि अस्सल हात मागाचे कापड खरेदी करावे असे आव्हान आयोजकांकडून करण्यात आले आहे.