नागपूर : देशातील सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्टीने मागास क्षेत्राचा, आदिवासी भागाचा विकास करून सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढविणे आणि नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देणे, निर्यात वाढविणे हा आत्मनिर्भर भारतकडे जाणारा मार्ग आहे, असे प्रतिपादन केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग बांधणी, वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
‘आत्मनिर्भर भारत’ अराईझ न्यू इंडिया चॅलेंज, या विषयावर ना. गडकरी उपस्थितांशी संवाद साधत होते. ‘एमएसएमई’ हे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- आज एमएसएमईची वाढ 30 टक्के असून ही 50 टक्क्यांपर्यंत आम्ही नेऊ. निर्यात 48 टक्क्यांवरून 60 टक्क्यांवर तर पाच वर्षात 5 कोटी रोजगार निर्मितीचे आमचे लक्ष्य आहे. ग्रामीण भारत आणि आदिवासी क्षेत्रासह 115 मागास जिल्ह्यांचा विकास आज आवश्यक आहे. ग्रामीण भारताची वाढ (ग्रोथ) फार कमी आहे, त्याचा देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नावर परिणाम होत आहे. धोरण ठरवताना शहरी आणि ग्रामीण भारत असा विचार करण्याची गरज आहे. आमच्यात काय कमतरता आहे, कशाची आवश्यकता आहे, याचा विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
सेल्फ असेसमेंट आधारावर कामास प्राधान्य
आजही केंद्र व राज्य सरकारांमध्ये मागासवर्गीय, आदिवासी आणि कृषी क्षेत्रासाठी वेगळा निधी असतो. पण या निधीचा उपयोग कसा होतो, याचे परीक्षण केले गेले तर अधिक परिणामकारक ठरेल. आत्मनिर्भर भारत ही संकल्पना पूर्णत्वाकडे जाण्यास हेही कारणीभूत ठरेल, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- एमएसएमईमध्ये डिजिटल पध्दती तयार व्हावी असे प्रयत्न आहे. कोणताही निर्णय 15 दिवसात घेतला जावा. पण वन आणि पर्यावरण विभागाकडून येणार्या अडचणी त्वरित सोडविल्या जाव्यात. कारण नवीन उद्योजकाला ज्या अडचणी येतात त्या वर्षभराच्या कालावधीपर्यंत सुटत नाही. ‘सेल्फ असेसमेंट’ आधारावर ही कामे झाली तर फाईल लवकर मार्गी लागतील, असेही ते म्हणाले.
जनसामान्यांपर्यंत संशोधने पोहोचविन्याची गरज
देशात अनेक क्षेत्रात नवीन संशोधने केली जातात पण ही संशोधने लोकांपर्यंत पोचतात काय, गरीब, मागास भागांपर्यंत ही संशोधने पोचली तर त्या भागाला त्याचा फायदा होईल, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- शासनात नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करणास अनेक जण पुढाकार घेतात पण संरक्षण मिळाले तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल. तसेच जैविक इंधन,तांदळापासून इथेनॉल निर्मिती, निर्यात अधिक वाढावी, त्यामुळे रोजगारात वाढ होईल या दिशेने आम्ही काम करीत आहोत, असेही ना. गडकरी म्हणाले.