Home Social सावित्रीबाई फुले जयंती विशेष । क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी सामाजिक कुप्रथांविरोधात चळवळींचेही नेतृत्व केले

सावित्रीबाई फुले जयंती विशेष । क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी सामाजिक कुप्रथांविरोधात चळवळींचेही नेतृत्व केले

643

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केवळ पती महात्मा जोतिराव फुले यांच्यासमवेत कार्य केले नाही, तर तत्कालीन समाजातील बालहत्या प्रतिबंध, विधवा महिलांची बाळंतपणे, केशवपनासारख्या कुप्रथांविरोधात चळवळी, आंदोलने उभारून त्याचे नेतृत्वही केलेे, अशी माहिती आता प्रकाशात आली आहे.

सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त फुले साहित्याचे गाढे अभ्यासक, संशोधक, लेखक प्रा. हरी नरके यांच्याशी संवाद साधला असता सावित्रीबाईंच्या जीवनातील नवा पैलू त्यांनी उलगडला. ते म्हणाले, महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या इतिहासात मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या सावित्रीबाई पतींच्या समवेत कार्य करण्यापुरत्या मर्यादित नव्हत्या, तर तत्कालीन समाजजीवनात प्रचलित अनेक कुप्रथांविरोधात त्यांनी स्वतंत्र ठाम भूमिका घेऊन चळवळी-आंदोलने उभारली, त्यांचे नेतृत्वही केले होते.

सावित्रीबाईंचे हे कर्तृत्व काहीसे अपरिचित, अज्ञात राहिल्याने सावित्रीबाई म्हणजे महात्मा ज्योतिबांसमवेत समाजोद्धाराचे, महिलांच्या शिक्षणाचे कार्य करणाऱ्या अशी मर्यादित समजूत प्रचलित झाली आहे. मात्र, महात्मा फुले यांच्या समग्र वाङ्मयाचे जे खंड नव्याने प्रकाशित झाले आहेत त्यातील अधिकृत माहितीनुसार सावित्रीबाई ज्योतिबांच्या कार्याला फक्त ‘मम’ म्हण्यापुरत्या नव्हत्या. त्यांनी बालहत्या प्रतिबंध, विधवा महिलांची बाळंतपणे, सत्यशोधक विवाह आणि केशवपनासारख्या कुप्रथांविरोधात चळवळी-आंदोलने उभारून त्यांचे नेतृत्वही केले होते, अशी माहिती आता प्रकाशात आली आहे.

या सर्व उल्लेखांवरून सावित्रीबाई केवळ शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत होत्या असे नव्हे, तर त्यांचे कर्तृत्व विविधांगी होते हे नव्याने पुढे आले आहे, असेही प्रा. नरके म्हणाले.

सत्यशोधक पद्धतीच्या विवाहाचा सावित्रीबाईंनी पुरस्कार केला, असे पहिले लग्न स्वत: पुढाकार घेऊन पार पाडले. केशवपन पद्धतीविरोधात नाभिकांचा संप घडवून आणला. ‘पतीचे निधन झालेल्या स्त्रियांना केशवपन करून विद्रूप करणार नाही, त्यांच्या मस्तकावर वस्तरा फिरवणार नाही,’ अशी शपथ घेऊन नाभिक बांधवांनी सावित्रीबाईंच्या नेतृत्वाला साथ दिल्याचे उल्लेख जोतिरावांनी केले आहेत.

सावित्रीबाईंच्या या बहुविध सामाजिक कार्याची माहिती खुद्द जोतिरावांनीच पत्रांच्या माध्यमातून लिहून ठेवलेली आहे. सावित्रीबाईंनी विधवा महिलांच्या बाळंतपणाची सोय स्वत:च्या घरात केली होती. तसेच बाळंतपणात बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते. अशा ३५ बाळंतपणांचा उल्लेख जोतिरावांनी केला आहे, असे नरके म्हणाले.