Home कोरोना होय, ही कोरोनाची तिसरी लाटच! जानेवारी अखेरीस उच्चांक गाठणार : टाेपे

होय, ही कोरोनाची तिसरी लाटच! जानेवारी अखेरीस उच्चांक गाठणार : टाेपे

502

राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. यामुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जानेवारीअखेरपर्यंत ही लाट उच्चांक गाठेल. मात्र, ८५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. राज्यात मोठ्या प्रमाणावर लोक होम क्वाॅरंटाइन आहेत. त्यांना घरपोच उपचारांचे किट पोहोचवले जाईल. २० मिली सॅनिटायझर, १० मास्क, माहिती पुस्तिका, १० पॅरासिटामॉल गोळ्या, २० मल्टी व्हिटॅमिनच्या गोळ्यांचे हे किट जिल्हाधिकाऱ्यांमार्फत रुग्णांपर्यंत पोहोचेल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी ५ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील संसर्गाचा आढावा घेतला. बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे उपस्थित होते. बैठकीनंतर याविषयीची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.

राज्यातील १.७३ लाख सक्रिय रुग्णांपैकी ८५% रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. १,७११ रुग्ण आयसीयूत आहेत. हे प्रमाण ते एकूण रुग्णांच्या १ टक्केच आहे. केवळ २% म्हणजे, ५,४०० लोकांना ऑक्सिजन द्यावे लागले. त्यामुळे १३% लोक हे सौम्य व मध्यम स्थितीतील आहेत.

राज्यात आरोग्य विभागाचा डॅशबोर्ड तयार केला जाणार आहे. या कॉलसेंटरवरून रुग्णाला क्वॉरंटाइनच्या कालावधीत कॉल करून प्रकृतीची विचारणा केली जाईल. पहिल्या, पाचव्या आणि सातव्या दिवशी या रुग्णांना कॉल केले जातील व त्यांची नोंद ठेवली जाईल. रुग्णाला अडचण आल्यास त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात यावे यासाठी ही प्रकिया सुरू करणार असल्याचे टोपे म्हणाले.