Home हिंदी कोराडी वीज केंद्रात FGD सिस्टम लावण्यात उशीर का?, खा. तुमाने यांची सीआयडी...

कोराडी वीज केंद्रात FGD सिस्टम लावण्यात उशीर का?, खा. तुमाने यांची सीआयडी चौकशीची मागणी

725

नागपूर : कोराडी येथील औष्णिक वीज केद्रात FGD (फ्युल गॅस डीसल्फरायजेशन) सिस्टम लावण्यात होत असलेल्या उशिरा बाबत सीआयडी चौकशी करण्याची मागणी खा. कृपाल तुमाने यांनी केली आहे. FGD सिस्टम अद्याप लावली नसल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून नागरिकांना श्वसनाचे आजार होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सन 2022 पर्यंत ही सिस्टम लावणे अनिवार्य आहे.

सीआयडी चौकशी व्हावी यासाठी खा.कृपाल तुमाने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उर्जा मंत्री डॉ. नितीन राउत व महाजेनकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लिहिले आहे. कोराडी येथील वीज केंद्रात प्रदुषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी वीज केंद्रात एका संचासाठी फ्युल गॅस डीसल्फरायजेशन सिस्टम लावण्यात यावे यासाठी मे 2017 साली निविदा काढण्यात आली. ही निविदा रद्द करून 660 मेगा वॅटचे तीन नवीन संचासाठी ही निविदा मे 2018 साली नव्याने काढण्यात आली. त्यात एका कंपनीला ही निविदा प्राप्त झाली. मात्र, निविदा मूल्य ठरविण्यात आले नसल्याने ही प्रक्रिया पुन्हा रद्द करण्यात आली व नवी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.

नोव्हेंबर 2019 मध्ये यासाठी काढलेली निविदा भारत सरकारच्या एका सार्वजनिक उपक्रम EPIL (इंजिनिअरींग प्रोजेक्ट्स इंडिया लि.) या कंपनीला मिळाली. 850 कोटी रुपयातून हे काम EPIL करणार होते. मात्र 10 महिन्याचा कालावधी निघून गेल्यावरही अद्याप ही प्रक्रिया सुरु करण्यात आलेली नाही. महाजेनकोच्या एका संचालकाचा आग्रह ही FGD ची निविदा एका खासगी कंपनीला मिळावी यासाठी असल्याने हा उशीर होत असल्याची माहिती आहे. यामुळे निविदा मिळाल्यानंतरही काम सुरु करण्याचे पत्र अद्याप सरकारी कंपनीला मिळालेले नाही. पहिली निविदा देखील सरकारी कंपनीला प्राप्त झाली होती हे विशेष.

तर महाजेनला लावला जाऊ शकतो दंड

पर्यावरण व नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे व प्रदूषण कमी व्हावे यासाठी सर्व औष्णिक वीज केंद्रात फ्युल गॅस डीसल्फरायजेशन सिस्टम लावणे सर्वोच्च न्यायालयाने अनिवार्य केले आहे. शिवाय उर्जा प्रकल्पात ही सिस्टम लावण्यात आली आहे अथवा नाही यासाठी एक चौकशी समिती तयार केली आहे. FGD सिस्टम वेळेत न लावल्यास महाजेनेकोला दंड लावला जाऊ शकतो.

कोराडी प्रकल्पाच्या आसपास नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कोराडी वीज प्रकल्पाच्या आसपास धूर व प्रदुषणामुळे अनेक श्वसनाचे आजार बळावले आहेत. कोराडी व आसपासच्या खेड्यात असे रुग्ण दिसून येतात, सध्या कोरोना संसर्ग असल्याने श्वसनाचे आजार वाढले आहेत. शिवाय कोराडी व आसपासच्या क्षेत्रात प्रदूषणामुळे कोरोना संसर्ग वाढला आहे, असे मत स्थानिक नागरिकांनी नोंदविले आहे.