Home Legal ‘हिंदुस्थानी भाऊ’ची न्यायालयात माफी; आंदोलनाला पैसे कुणी दिले याची चौकशी करणार

‘हिंदुस्थानी भाऊ’ची न्यायालयात माफी; आंदोलनाला पैसे कुणी दिले याची चौकशी करणार

536

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी भडकावल्याप्रकरणी विकास पाठक ऊर्फ हिंदुस्थानी भाऊ याने न्यायालयात माफी मागितली. पाठक आणि इकरार खान या दोघांना मंगळवारी (१ फेब्रुवारी) वांद्रे न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

विकास पाठक आणि इकरार खान यांना धारावी पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात हजर केले. विकास पाठक आलिशान हॉटेलात राहत होता, तसेच त्याला समाजमाध्यम हाताळण्याप्रकरणी निधी कुणी पुरवला याची चौकशी करायची आहे, त्यासाठी पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी मुंबई पोलिसांनी केली होती. तर आम्ही केवळ विद्यार्थ्यांना बोलावले होते. मात्र काही समाजकंटक आंदोलनात घुसले, त्यांनी हिंसाचार केला, पोलिसांवर हल्ला झाला, काही वाहनांचे नुकसान झाले, त्याप्रकरणी माफी द्यावी, असा बचाव पाठकच्या वतीने वकील महेश मुळे यांनी केला.

सुमारे ३ लाख युजर्सनी पाहिले व्हिडिओ : दहावी-बारावी परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात यासाठी आंदोलन करण्याचे आवाहन विकास पाठक याने २४ जानेवारी रोजी समाजमाध्यमांवर केले होते. दोन लाख ७७ हजार युजरनी पाठकच्या त्या चित्रफिती पाहिल्या होत्या. त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोमवारी मुंबईसह राज्यभरात विद्यार्थी आंदोलने झाली होती.