Home मराठी महाघोटाळा । शिपयार्ड कंपनीचा 28 बँकांना 23 हजार कोटींचा चुना

महाघोटाळा । शिपयार्ड कंपनीचा 28 बँकांना 23 हजार कोटींचा चुना

522

देशभरातील स्टेट बँक ऑफ इंडियासह तब्बल २८ प्रमुख बँकांची २२ हजार ८४२ कोटींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून एबीजी शिपयार्ड लिमिटेड या कंपनीसह, कंपनीचे माजी अध्यक्ष-महासंचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह इतर अधिकाऱ्यांवर सीबीआयने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. बँकेच्या फसवणुकीचा हा आजवरचा सर्वात मोठा घोटाळा ठरला आहे. दरम्यान, सीबीआयने ७ फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार शनिवारी एबीजी कंपनीसह संबंधित संचालकांच्या मुंबई, पुणे, सुरत, भरूच अशा १३ ठिकाणी छापे टाकले. यात मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

न्यायवैद्यक ऑडिटनुसार स्पष्ट झाले आहे की, २०१२ ते २०१७ या काळात आरोपींनी संगनमत करून या हजारो कोटी रकमेचा गैरवापर केला. बँकांकडून वेगळ्या उद्देशाने कर्ज घेऊन या रकमेचा वापर मात्र इतरत्र केल्याचे उघडकीस आले आहे. यादरम्यान, संबंधित बँकांनी २०१६ मध्ये कंपनीचे हे खाते एनपीए घोषित केले होते. नंतर २०१९ मध्ये या खात्याला “फ्रॉड अकाउंट’ घोषित करण्यात आले होते.

सूत्रांनुसार, अग्रवाल यांच्याव्यतिरिक्त कंपनीचे तत्कालीन कार्यकारी संचालक संथानम मुथास्वामी, संचालक अश्विनीकुमार, सुशीलकुमार अग्रवाल, रवी विमल निवेतिया आणि अन्य एक कंपनी एबीजी इंटरनॅशनलविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे.

एफआयआरनुसार घोटाळा करणाऱ्या दोन कंपन्या आहेत. यात एबीजी शिपयार्ड आणि एबीजी इंटरनॅशनल प्रा. लि. या कंपन्यांचा समावेश आहे. अर्थात, या दोन्ही कंपन्या एकाच समूहाच्या आहेत. बँकांसोबत एलआयसीलाही कंपन्यांनी सुमारे १३६ कोटी रुपयांचा फटका दिला.

सुरतच्या मगदल्लामध्ये १९८५ मध्ये सुरू झालेली एबीजी शिपयार्ड कंपनी जहाज बांधणी व दुरुस्तीचे काम करत होती. १९९१ पर्यंत चांगला नफा कमावला. देश-विदेशातून ऑर्डर मिळत. मा़, २०१६ मध्ये कंपनीला ५५.७ कोटी डॉलरचा तोटा झाला. व्यवसाय कमी झाल्याने उलाढाल मंदावली. खर्चात वाढ आणि उत्पन्न कमी यातून तोटा प्रचंड वाढत गेला. दुसरीकडे जागतिक मंदीमुळे कंपनी गोत्यात आली. कंपनीने रशियाच्या एका कंपनीला काही समभाग विकण्याचा प्रस्ताव ठेवला होता.