एमएसएमई आणि विद्यापीठांची भूमिका यावर संवाद
नागपूर : कृषी, ग्रामीण व आदिवासी क्षेत्राचा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास होण्याच्या दृष्टीने विद्यापीठांनी उद्यमशीलता, कौशल्य असलेले मनुष्यबळ निर्मिती, संशोधन व उच्च तंत्रज्ञान याचा अभ्यास करून रोजगार निर्मितीस पुढाकार द्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग बांधणी, वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
Interaction with Punyashlok Ahilyabai Holkar Solapur University on 'MSME and Role of Universities' https://t.co/i3zbHUYGy1
— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) September 12, 2020
5 कोटी रोजगार निर्मितीचे लक्ष्य
एमएसएमईचा जीडीपी 30 टक्के आहे, तो 50 टक्क्यांवर, निर्यात 48 टक्के आहे, ती 60 टक्क्यांपर्यंत व येत्या 5 वर्षात 5 कोटी रोजगार निर्मितीचे आमचे लक्ष्य असल्याचे सांगून ना. गडकरी म्हणाले, आज 6 कोटी उद्योग अस्तित्वात आहेत. खादी ग्रामोद्योगतर्फे सुरु असलेल्या हॅण्डलूम, हँडीक्राफ्ट उद्योगाची उलाढाल 88 हजार कोटी आहे, ती 5 लाख कोटीपर्यंत न्यायची आहे. सोलापूर भागात डाळिंबाचे व साखर व उसाचे उत्पन्न अधिक आहे. डाळिंबाची निर्यात आणि साखरेपासून इथेनॉल निर्मितीचे उद्योग या भागात सक्षम राहतील. बाजाराची मागणी लक्षात घेता विविध वस्तूची निर्मिती व्हावी. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी, प्राध्यापक यांचेशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी प्रामुख्याने ऑनलाईन उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी पुढे म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण हे व्यवसायाभिमुख व तांत्रिक शिक्षणास प्रोत्साहन देणारे आहे. युवकांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल, याचा विचार विद्यापीठांनी केला पाहिजे. ज्ञानाचे व कचर्याचे संपत्तीत रुपांतर कसे करता येईल याचे शिक्षण मिळाले पाहिजे. कृषी, ग्रामीण व आदिवासी क्षेत्रातील अर्थव्यवस्थेचा अभ्यास विद्यापीठाने करावा. संबंधित जिल्ह्यांची क्षमता व कमतरता याचा अभ्यास करताना क्षमता कशा वाढतील आणि कमतरता कशा कमी होतील याचाही अभ्यास होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.