मुंबई ब्युरो : चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या भरघोस यशामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यावर आणि सरकारवर भाजपकडून हल्ले वाढू शकतात. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिराही वाढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांपर्यंत आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात “भ्रष्टाचार’ हाच मुद्दा भाजप लावून धरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर सेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांभोवतीचे चौकशीचे फास आवळले जात असल्याने वर्षा बंगल्यावरील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सुमारे तासभर निर्णायक बैठक झाली
१६ मार्चला विधानसभा अध्यक्ष निवडणूक?.
दरम्यान, या बैठकीमध्ये ओबीसी आरक्षण, विधानसभा अध्यक्ष निवडीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घेण्यास संमती देणार असल्याचे सांगितले आहे, तसा निर्णय सोमवारी होईल. त्यामुळे आपल्याला १६ मार्च रोजी निवडणूक घेता येईल त्याप्रमाणे नियोजन करावे, अशी चर्चा बैठकीत झाली. अध्यक्ष निवडणुकीत आवाजी मतदानाने अध्यक्ष निवडण्यासाठी नियमात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपल्याला कोणताही दगाफटका होणार नाही याविषयी बैठकीत चर्चा झाली.
भाजपकडून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात, आमदारांना फोडण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात, जे आमदार फुटत नाहीत त्यांना ईडी व केंद्रीय तपास यंत्रणांची भीती घातली जाऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर आपल्या घटक पक्षांनी खबरदारी घ्यायला हवी, असेही या बैठकीत ठरले. शिवसेनेचे अनिल परब आणि संजय राऊत यांच्याविषयीच्या ईडीच्या कारवाया गतिमान होऊ शकतात, असाही सूर या बैठकीत निघाला. ओबीसी आरक्षण व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांवर या बैठकीत चर्चा झाली.
राज्यपाल महोदयांनी निवडणूक सुधारणा कायद्यावर सह्या केल्यामुळे तीन-चार महिने निवडणुका पुढे ढकलता येणे शक्य आहे. त्यादरम्यान ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डेटा जमा करता येईल असाही सूर बैठकीत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन गेल्यानंतर त्यांच्यापाठोपाठ विरोधी पक्षनेते व भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी राज्यपालांची राजभवनात जाऊन भेट घेतली. त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील कळू शकला नाही. दरम्यान, राज्यपालांना एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी गेल्याचे पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचे नेते शुक्रवारी राज्यपालांच्या भेटीला गेले. यामध्ये नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, विजय वडेट्टीवार यांचा समावेश होता. ओबीसी आरक्षण आणि विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत राज्यपालांशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाविकास आघाडीचे नेते विविध मुद्यांवर राज्यापालांच्या भेटीला गेले आहेत. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत नेत्यांनी किमान चार वेळा भेट घेतली आहे. मात्र, अजूनही राज्यापालांनी यावर मत व्यक्त केले नाही. त्यामुळे आता अधिवेशनापूर्वी अध्यक्षपदाची निवड होते की नाही हे लवकरच ळळेल.