Home मराठी 23 वर्षीय तरुणीची नागपूरमध्ये जाळून हत्या; जळलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

23 वर्षीय तरुणीची नागपूरमध्ये जाळून हत्या; जळलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

नागपूर ब्युरो : नागपुरमध्ये एका 23 वर्षीय तरुणीची पेट्रोल टाकून जाळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत सुराबर्डी परिसरामध्ये तरुणीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. या तरुणीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह जाळण्यात आला की तिला जिवंत जाळले याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. सुराबर्डी जवळील म्हाडा क्वार्टर समोरील मैदानात ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनूसार, मृत तरुणी नागपुरातील खामला परिसरात एका खासगी कंपनीत काम करत होती. काल कार्यालयात गेल्यानंतर ती संध्याकाळी घरी परत आली नाही. त्यामुळे तिच्या आईने प्रतापनगर पोलिस स्टेशनमध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. पोलिस तिचा शोध घेत असताना संध्याकाळी सुराबर्डी परिसरात रिकाम्या म्हाडा क्वार्टर समोरील मैदानात तिचे जळालेले प्रेत एका गावकऱ्याला दिसून आले. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. वाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत सुराबर्डी परिसरात घडलेल्या या धक्कादायक घटनेने प्रशासनाची झोप उडाली आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.