महाराष्ट्रात परिवर्तनाचे वारे वाहत आहे. चार राज्यांत भाजपची सत्ता येऊ नये म्हणून विरोधक देव पाण्यात बुडवून बसले होते. पण, या मुंगेरीलालांची हसीन स्वप्ने पूर्ण होऊ शकली नाहीत. आता आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही भगवा फडकवत एकहाती सत्ता आणू, अशी ग्वाही विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
गोव्याचे प्रभारी म्हणून सर्वोत्तम कामगिरी करत देवेंद्र फडणवीस यांनी तेथे विजय मिळवला. त्यानंतर नागपुरात आले असता त्यांचा नितीन गडकरी यांच्या वर्धा रोड येथील निवासस्थनाजवळ शहर भाजपतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी उभय नेत्यांनी कार्यकर्त्यांना विजयाचा विश्वास दिला. या वेळी शहर आणि जिल्हा भाजपतर्फे गडकरी यांच्या हस्ते फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी विमानतळ ते गडकरी निवासस्थानापर्यंत मोठी रॅली काढण्यात आली. यात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
गडकरी म्हणाले की, गोव्यात भाजपला अपशकुन व्हावा म्हणून विरोधक टपून बसले होते. पण, त्यांचे मनसुबे यशस्वी झाले नाहीत. आतापर्यंत आम्हाला इतरांची मदत घ्यावी लागत होती. पण, या वेळेस फडणवीसांच्या नेतृत्वात आम्ही बहुमताने सत्ता मिळवली, असे गडकरी म्हणाले.
स्वागत, प्रेम आणि हे आशीर्वाद…!
केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी आणि सौ. कांचनवहिनींचा मी आभारी आहे…@nitin_gadkari #Nagpur #Blessings #warmth #love pic.twitter.com/W6LRZ0wj2q— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 17, 2022
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपने चार राज्यांत सत्ता मिळवली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही परिवर्तनाचे वातावरण आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह विधानसभा निवडणुकीतही भाजपची एकहाती सत्ता आणू, असे फडणवीस म्हणाले. मागील वेळेस गोव्यात गडकरी एकटे होते. या वेळेस आम्ही दोघे मिळून विजय खेचून आणू, असे गडकरींनी सांगितले होते. ते आम्ही खरे केले. गोव्यातील विजयाचे श्रेय टीम गोवा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासकामांना आहे. मोदींच्या नेतृत्वात देश बदलत आहे, असे फडणवीस म्हणाले.
गोव्यात आमच्या विरोधात लढलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीला नोटापेक्षाही कमी मते मिळाली, असा टोला फडणवीस यांनी हाणला. महावसुली आघाडीच्या सरकारविरुद्ध असलेली भ्रष्टाचाराची लढाई आता टोकाला पोहोचली आहे. या सरकारचा भ्रष्टाचार खणून काढणार असून सरकारच्या डावपेचांना आम्ही भीत नाही, असे फडणवीस म्हणाले.