केंद्र सरकारकडून आणल्या जाणार असलेल्या चार कामगार कायद्यांना विरोध करण्यासाठी दहा केंद्रीय कामगार संघटनांनी २८ आणि २९ मार्च रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्याचा परिणाम राज्यातील आर्थिक उलाढालीवर होणार आहे. संप २ दिवसांचा असला तरी बँका मात्र सलग ४ दिवस बंद राहणार असल्याने व्यवहारावर त्याचा परिणाम जाणवेल. ऐन मार्च एंडला बँका चार दिवस बंद राहतील. बँकेची कामे उरकण्यासाठी आजचा शुक्रवार महत्त्वाचा ठरणार आहे. या संपात स्टेट बँकेच्या तसेच केंद्रीय कामगार संघटना सहभागी नाहीत, त्यामुळे प्रमुख खासगी व सहकारी बँका मात्र सुरू रहाणार आहेत.
प्रचंड संघर्षानंतर मिळवलेले अधिकार या चार कामगार कायद्यांमुळे कामगारांना गमवावे लागणार असून याविरोधात प्रचंड असंतोष देशभरातील कामगारांत उमटला आहे. या दाेनदिवसीय देशव्यापी संपात केंद्रीय कामगार संघटनांचे सभासद आहेत, अशा बँक आॅफ महाराष्ट्रसह बहुतांश राष्ट्रीयीकृत बँकांचे कामगार संपात सहभागी होतील. त्याचा परिणाम आर्थिक उलाढालीवर होणार आहे.
बँक बंद राहणार असल्या तरी ऑनलाइन बँकिंगचा पर्याय उपलब्ध असल्याने व्यवहार करण्यास विशेष अडचणी जाणवणार नाहीत. स्टेट बँका सुरू असल्या तरी इतर बँकांचे धनादेश क्लिअरिंग ठप्प राहील. सर्व बँकेचे एटीएम नियमित सुरू राहतील, यामुळे रोख रकमेची टंचाई सामान्यांना अधिक जाणवणार नाही.