महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्यात 1 एप्रिलपासून कोरोना निर्बंध हटवण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. परंतु सणवार साजरे करताना काळजी घेण्याचे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.
रेल्वे, बस, मॉलमधील कोविड नियमावलीच्या शिथिलीकरणाबाबत टास्क फोर्ससोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच परदेशात सध्या कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्या नागरिकांनी लस घेतलेली नाही, त्यांनी ती ताबडतोब घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
आरोग्यमंत्री टोपे पुढे म्हणाले की, सध्या युरोप, चीन, साऊथ कोरियात कोरोनाची वाढणारी रुग्णसंख्या पाहता सतर्कता बाळगावी लागणार आहे. त्यामुळे आताच पूर्णपणे मास्कमुक्तीचा विचार करण्यात आलेला नाही. मास्क मुक्तीचं धाडस शक्य नाहीये. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरलाच गेला पाहिजे. तेच आपल्यासाठी हितकारक असल्याचंही त्यांनी सांगितलं.