Home मराठी ‘विक्रांत वाचवा’ निधी प्रकरणी सोमय्या पितापुत्रांना ट्रॉम्बे पोलिसांचा समन्स; आज हजर राहण्याचे...

‘विक्रांत वाचवा’ निधी प्रकरणी सोमय्या पितापुत्रांना ट्रॉम्बे पोलिसांचा समन्स; आज हजर राहण्याचे निर्देश

भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. आयएनएस विक्रांत बचावसाठी जमवलेल्या निधीप्रकरणी सोमय्या यांच्याविरोधात मुंबईतल्या ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरुनच पोलिसांनी सोमय्या पितापुत्रांना समन्स बजावले आहे. आज सकाळी 11 वाजता दोघांनाही पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, सध्या तरी सोमय्या पिता-पुत्र नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे आज अकरा वाजता सोमय्या चौकशीसाठी हजर राहतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर सोमय्यांची चौकशी होणार आहे.

आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी केलेल्या मोहिमेत किरीट सोमय्यांनी 58 कोटी रुपये गोळा केले होते, ते पैसे सोमय्या यांनी राजभवनात जमाही केले नाहीत असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यासंदर्भात किरीट सोमय्या म्हणाले होते की, आधी 58 कोटी रुपये गोळा केल्याचा पुरावा द्या, मी तर फक्त प्रतिकात्मक आंदोलन केले. 35 मिनिटांत इतकी रक्कम कशी काय जमा होऊ शकते असा सवालही त्यांनी केला. मात्र त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांच्या जुन्या ट्विटचा आधार घेत 58 कोटींचा आरोप आता 140 कोटी रुपयांवरही नेऊन ठेवला आहे, असे म्हटले होते.

याप्रकरणी किरीट सोमय्या यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, किरीट सोमय्या आणि निल सोमय्या यांना आज पोलिसांनी 11 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. पण ही एफआयआर ऐकीव माहितीच्या आधारावर असल्याचे सोमय्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या सगळ्या आरोपांतून आता पुढचे नाट्य कुठल्या दिशेने जाणार, पुढची लढाई कोर्टात लढली जाणार का, सोमय्यांना अटक होणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अजून बाकी आहेत.

मुंबई पोलिसांनी दाखल केलेला माझ्याविरोधातील एफआयआर हा हास्यास्पद असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले. एका नागरिकाने वृत्तपत्रातील बातमीच्या आधारे ही तक्रार नोंदवली. त्यामध्ये कोणताही पुरावा नसल्याचे सांगितले. पोलिसांनी माझ्यावरील गुन्हा सिद्ध करावा असे आव्हान त्यांनी दिले.