Home Defence अत्याधुनिक चिलखती वाहने लष्करात, लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या उपस्थितीत वाहने सुपूर्द करण्यात...

अत्याधुनिक चिलखती वाहने लष्करात, लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या उपस्थितीत वाहने सुपूर्द करण्यात आली

आत्मनिर्भर योजनेंतर्गत भारताने अनेक स्वदेशी कंपन्यांना आता शस्त्रास्त्र निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले आहे. टाटा उद्योग समूह आणि कल्याणी समूह या भारतीय कंपन्यांनी आपल्या लष्करासाठी अत्याधुनिक चिलखती वाहने बनवली आहेत. शत्रूंचा गोळीबार, बॉम्बवर्षावात ही वाहने थेट युद्धभूमीत सैन्याला सुरक्षित ठेवणार आहेत. लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आणि उपलष्करप्रमुख मनोज पांडे यांच्या उपस्थितीत मंगळवारी पुण्यात ही वाहने लष्करात दाखल करण्यात आली.

बॉम्बे सॅपर्स ग्रुपमध्ये एका कार्यक्रमात ही वाहने लष्कराला सुपूर्द करण्यात आली. क्यूआरएफव्ही अर्थात मध्यम क्षमतेची त्वरित प्रतिसाद लढाऊ वाहने, आयपीएमव्ही अर्थात लष्कर संरक्षित वाहतूक वाहने, टीएएसएल अर्थात टाटा अॅडव्हान्स सिस्टिम लिमिटेड या कंपनीद्वारे निर्मित अत्यंत दीर्घ पल्ल्याची निरीक्षण यंत्रणा तसेच भारत फोर्ज या कंपनीद्वारे निर्मित मोनोकॉक हल मल्टिरोल माइन संरक्षित सशस्त्र वाहन या विशेष वाहनांची पहिली तुकडी लष्कराच्या सेवेत मंगळवारी दाखल झाली.

यापूर्वी रशियन किंवा इतर देशांनी निर्मित केलेली चिलखती वाहने भारतीय लष्कर वापरत होते. मात्र, आता भारतीय कंपन्यांनी ही उच्च दर्जाची सुरक्षा सैन्याला पुरवणारी वाहने बनवली आहेत.

या वाहनाचे प्रारूप आणि आखणी भारतातच करण्यात आली आहे. भारतीय सैन्याने वाळवंटात तसेच अतिउंचावरील भागात याच्या चाचण्या घेतल्या असून प्रत्येक चाचणीत हे वाहन यशस्वी ठरले आहे. या चिलखती वाहनात डीआरडीओच्या डिफेन्स मेटॅलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरीने विकसित केलेले एक्स्टर्नल अ‍ॅड-ऑन आर्मर प्रोटेक्शन पॅनल्स आणि थर्मल साइट्ससह रिमोट कंट्रोल्ड वेपन सिस्टिमचादेखील समावेश आहे. शत्रूचे भूसुरुंग तसेच हायक्वालिटीचे शस्त्रसुद्धा या वाहनांना भेदू शकत नाही. त्यामुळे थेट युद्धभूमीत भारतीय सैन्याला या वाहनांमुळे आघाडी मिळणार आहे. या चिलखती वाहनांचे १२ युनिट लष्कराला देण्यात आले आहेत.

वाहन निर्मितीत ‘डीआरडीओ’च्या तंत्रज्ञानाची मदत
लडाखसारख्या अतिउंचावरील क्षेत्रात सैन्याला वेगाने पोहोचवण्यासाठी टाटा उद्योग समूहाने इन्फंट्री प्रोटेक्टेड मोबिलिटी व्हेइकल्स (आयपीएमव्हीएल) ही चिलखती वाहने तयार केली आहेत. ही चिलखती वाहने संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) यांच्या मदतीने बनवण्यात आली आहेत. पुण्यातील कारखान्यातच याची निर्मिती करण्यात आली आहे.