Home मराठी राणा दाम्पत्याला पोलिसांची नोटीस:कायदा व सुव्यवस्थेला धक्का न पोहोचवण्याची विनंती

राणा दाम्पत्याला पोलिसांची नोटीस:कायदा व सुव्यवस्थेला धक्का न पोहोचवण्याची विनंती

मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे. या नोटीशीद्वारे कायदा-सुव्यवस्थेला धक्का न पोहोचवण्याची विनंती पोलिसांनी केली आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी म्हणजेच मातोश्री बाहेर उद्या हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान आमदार रवि राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी दिले आहे. सुरूवातीला राणा दाम्पत्य रेल्वेने मुंबईत येणार, अशी माहिती असल्यामुळे त्यांना रोखण्यासाठी आज सकाळपासूनच सीएसएमटी रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. मात्र, त्यांना चकवा देत राणा दाम्पत्य थेट विमानाने मुंबईत दाखल झाले आहेत. ते सध्या खार येथील आपल्या निवासस्थानी असल्याची माहिती आहे.

रवि राणा आणि नवनीत राणा कोणत्याही प्रकारची सुरक्षा न घेता विमानाने मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आमदार रवी राणा तसेच खासदार नवनीत राणा यांच्या आंदोलन इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीसह वर्षा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओक तसेच इतर महत्वाच्या व्यक्तींच्या निवासस्थानी अलर्ट जारी करण्यात आला आहे. आंदोलन होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारी घ्यायच्या सूचना गृह मंत्रालयाने दिल्या आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निवासस्थान मातोश्रीसमोर उद्या राणा दाम्पत्य हनुमान चालिसाचे पठण करणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर राणा कुटुंबियांना कोणत्याही परिस्थितीत मुंबईला जाऊ देणार नाही, अन् हिंमत असेल तर सुरक्षेविना मुंबईला जाऊन दाखवा, असे आव्हान शिवसैनिकांनी राणा कुटुंबियांना दिले आहे. यामुद्द्यावरून अमरावतीतदेखील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राणा दाम्पत्याला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक बडनेरा रेल्वेस्थानकावर जमणार, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी दिली होती. मात्र, त्याआधीच राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान करत आमदार रवी राणा म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी स्वत: मातोश्रीसमोर येऊन हनुमान चालिसा पठण करावे. जर त्यांच्या या सगऴ्याला विरोध असेल तर आम्ही स्वत: हनुमान चालिसा वाचुन दाखवू असे ते म्हणाले. हिंदुत्त्वाचा पुरस्कार करत असाल तर ते सोडून कोणत्या दिशेने जात आहे, याची आठवण मी करुन देतो. व त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे स्मरण देऊ, असा इशारा आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

याविषयी आमदार रवी राणा म्हणाले की, अंधारात येणारा शिवसैनिक नाही, ही डरपोक सेना आहे. अंधारात कुणी हनुमान चालिसा वाचते काय? असा सवाल करून आम्हाला सांगायला पाहिजे होते आम्ही त्यांचे स्वागत केले असते पण आता रात्री चोरासारखे येऊन हनुमान चालिसा वाचणे हे योग्य नाही. असे राणा म्हणाले.