राज्यात आज कोरोनाचे नवीन २५४ रुग्ण सापडले आहेत. रिकव्हरी ९८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. राज्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या चर्चेत आता काही तथ्य वाटत नाही, असे स्पष्ट मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवरी नागपुरात बोलताना व्यक्त केले. एका कार्यक्रमानिमित्त टोपे शहरात आले होते. त्या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
टोपे म्हणाले, राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार नाही. कोरोना रुग्णांत वाढ नाही. लसीकरण चांगले झाले आहे. सध्या सक्रिय रुग्ण १९५० आहेत. आता तरी हा फार मोठा विषय नाही.
सध्या सर्वत्र गर्दी होत आहे, राजकीय मेळावे होत आहे. तरीही कोरोना रुग्ण अपेक्षित वाढत नाही. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. चौथ्या लाटेची सुतराम शक्यता वाटत नाही, असेही ते म्हणाले. मात्र, असे असले तरी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असेही त्यांनी या वेळी सांगितले.