खासदार क्रीडा महोत्सवचा समारोप : अरमान मलिकच्या गाण्यांवर थिरकली तरुणाई
नागपूर ब्यूरो: खेळाडूंसाठी खासदार क्रीडा महोत्सव हा एक मोठा यज्ञ आहे. देशातील प्रत्येक शहरात, जिल्ह्यात, राज्यात असे क्रीडा महोत्सव घेण्यात आले तर देशाला ऑलिम्पिकमध्ये एक नव्हे १०० मेडल्स मिळतील, असा विश्वास १९८३ मधील विश्व चषक विजेत्या भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून १३ मे पासून नागपुरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा शनिवारी २८ मे रोजी कपील देव यांच्या विशेष उपस्थितीत समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. आपल्या बहारदार गीतांनी सुप्रसिद्ध गायक अरमान मलीक नागपूरकरांच्या गळ्यातील ताईत ठरला. त्याच्या एकाहून एक गीतांवर यशवंत स्टेडियमवर तरुणाई चांगलीच थिरकली. नॉनस्टॉप गाणे, प्रेक्षकांशी संवाद या खास शैलीने संपूर्ण स्टेडियम एकाच सुरात रंगला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत शहरातील यशवंत स्टेडियम येथे झालेल्या दिमाखदार समारोपीय सोहळ्याला प्रख्यात भारतीय क्रिकेटपटू व १९८३ मधील विश्व चषक विजेत्या भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे एक्सिक्युटिव्ह डायरेक्ट डी. एस. किम, जेसीबी इंडिया लिमिटेडचे असोसिएट व्हॉईस प्रेसिडेंट जसमीत सिंग, खासदार डॉ. विकास महात्मे, खासदार क्रीडा महोत्सवचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी, माजी मंत्री ऍड. सुलेखाताई कुंभारे, आमदार प्रवीण दटके, आमदार नागो गाणार, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी मंत्री परिणय फुके, बबनराव तायवाडे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी महापौर दयाशंकर तिवारी आदी उपस्थित होते. खासदार क्रीडा महोत्सवाच्या चवथ्या सत्रात घेण्यात आलेल्या सर्व खेळांचे अध्यक्ष आणि सचिव यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
कपील देव यांनी खासदार क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष अभिनंदन केले व सर्व खेळाडूंच्या वतीने आभार ही मानले. आजच्या तरुणांमध्ये जोश, उत्साहाची कमतरता नाही त्यांना फक्त सुविधांची गरज असल्याचे ते म्हणाले. खेळाडूंनी पैशासाठी नाही तर पॅशनसाठी खेळण्याचा मोलाचा मंत्र त्यांनी यावेळी दिला. खेळात पॅशन असेल तर यश पायाशी लोळण घालील. मात्र आधीच जर पैशाच्या मागे लागलात तर यश मिळू शकणार नाही, असाही मंत्र त्यांनी दिला. खेळाडूंना खासदार क्रीडा महोत्सवासारखी साथ मिळाल्यास यशाचा मार्ग कुणीही रोखू शकणार नाही, असेही कपील देव म्हणाले.