Home Finance कर्ज महागले । रेपो दरात 0.50% वाढ, आता 4.90% वर; 20 वर्षांसाठी...

कर्ज महागले । रेपो दरात 0.50% वाढ, आता 4.90% वर; 20 वर्षांसाठी 10 लाख कर्जावर ईएमआय सुमारे 300 रुपये वाढणार

वाढत्या महागाईमुळे चिंतेत असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पुन्हा एकदा रेपो दरात वाढ केली आहे. त्यानुसार रेपो दर 4.40% वरून 4.90% पर्यंत वाढवला आहे. म्हणजेच तुमचे कर्ज महाग होणार आहे. त्यातुळे आता तुम्हाला जास्त ईएमआय भरावा लागेल. व्याजदरांबाबत निर्णय घेण्यासाठी 6 जूनपासून चलनविषयक धोरण समितीची बैठक सुरू होती. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत व्याजदरांबाबत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

रेपो रेट म्हणजे ज्या दारावर बँकांना RBI कडून कर्ज मिळते, तर रिव्हर्स रेपो दर हा दर आहे ज्यावर RBI बँकांना पैसे ठेवण्यावर व्याज देते. जेव्हा RBI रेपो दर कमी करते, तेव्हा बँका देखील बहुतेक वेळा व्याजदर कमी करतात. म्हणजेच ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचे व्याजदर कमी होतात, त्याचप्रमाणे ईएमआयही कमी होतो. त्याचप्रमाणे, जेव्हा रेपो दरात वाढ होते, तेव्हा व्याजदरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांसाठी कर्ज महाग होते. कारण व्यापारी बँकांना सेंट्रल बँकेकडून जास्त दराने पैसे मिळतात, ज्यामुळे त्यांना दर वाढवावे लागतात.

0.50% दर वाढीमुळे किती फरक पडेल?

समजा सुदर्शन नावाच्या व्यक्तीने 6.5% दराने 20 वर्षांसाठी 10 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे. त्याच्या कर्जाचा ईएमआय 7,456 रुपये आहे. 20 वर्षात त्याला या दराने 7,89,376 रुपये व्याज द्यावे लागेल. म्हणजेच त्याला 10 लाखांऐवजी एकूण 17,89,376 रुपये द्यावे लागतील.

सुदर्शनचे कर्ज घेतल्यानंतर एका महिन्यानंतर, RBI ने रेपो दरात 0.50% वाढ केली. या कारणास्तव, बँका व्याजदरात 0.50% वाढ करतात. आता जेव्हा सुदर्शनचा मित्र त्याच बँकेत कर्ज घेण्यासाठी पोहोचतो तेव्हा बँक त्याला 6.5% ऐवजी 7% व्याजदर देते.

सुदर्शनचा मित्र सुद्धा 10 लाख रुपये फक्त 20 वर्षांसाठी कर्ज घेतो, पण त्याचा ईएमआय 7753 रुपये होतो. म्हणजेच सुदर्शनच्या ईएमआयपेक्षा 297 रुपये जास्त. यामुळे सुदर्शनच्या मित्राला 20 वर्षात एकूण 18,60,717 रुपये द्यावे लागतील. ही रक्कम सुदर्शनच्या रकमेपेक्षा 71 हजार जास्त आहे.