नागपूर ब्युरो : राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) छात्रांना सैन्यदलात भरतीच्या वेळी महत्वाचे स्थान आहे. त्याच धर्तीवर अग्निपथ या सशस्त्र दलात भरतीच्या नवीन योजनेत देखील एनसीसी कॅडेटसना चांगली संधी राहणार आहे, असे राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी यांनी सांगितले.
सहयोगी राष्ट्रीय छात्र सेना अधिकाऱ्यांचा दीक्षांत संचलन सोहळा (पासिंग आऊट परेड) कामठी येथील अधिकारी प्रशिक्षण प्रबोधनी (ओटीए) मैदानावर बुधवारी सकाळी पार पडला. देशभरातील विविध शाळा-महाविद्यालयातून आलेल्या ७०६ सहयोगी राष्ट्रीय छात्र सेना अधिकाऱ्यांचे कामठी येथील प्रबोधनीत ४५ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. दीक्षांत संचलन सोहळय़ानंतर लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यांना अग्निपथ योजनेबद्दल विचारले असता ते म्हणाले, एनसीसीच्या ‘बी’ आणि ‘सी’ प्रमाणपत्र धारकांना सशस्त्र दलात भरतीसाठी विशेष महत्त्व दिले जाते. अग्निपथ योजनेंर्तगत चार वर्षांकरिता सैन्य भरती केली जाणार आहे. यात एनसीसी कॅडेट्सना चार वर्षांसाठी ‘अग्नीवीर’ बनण्याची चांगली संधी आहे. एनसीसीच्या उद्दीष्टाबद्दल ते म्हणाले, यवुकांना व कॅडेट्सना जबाबदार नागरिक बनवणे हा एसीसी चा मुख्य उद्देश आहे आणि एनसीसी कॅडेट जे अग्निवीर बनतील ते पुन्हा नागरी जीवनात परतल्यावर अधिक जबाबदार नागरिक बनतील, असेही ते म्हणाले.
करोना काळात राष्ट्रीय छात्र सेना अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होऊ शकले नव्हते. प्रशिक्षणासाठी पात्र अधिकाऱ्यांची प्रतिक्षा यादी वाढली होती. म्हणून यावेळेस सातशेहून अधिक सहयोगी अधिकाऱ्यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती. हे अधिकारी एनसीसी प्रशिक्षण देणारी शाळा, महाविद्यालय आणि समाज त्यांच्यातील दुवा आहेत. करोनाचे निर्बंध काढून टाकल्यानंतरची ही पहिली मोठी तुकडी आहे. प्रतीक्षा यादीत असलेल्या जास्तीत जास्त अधिकाऱ्यांना या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, असेही लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग म्हणाले.