एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी सायंकाळी ऑनलाइन संवाद साधला. तुमच्यापैकी कुणीही समोर येऊन सांगितले तर मी राजीनामा देईन, असे ते म्हणाले. या संवादानंतर ठाकरे यांनी आपले सरकारी निवासस्थान असलेला वर्षा बंगला सोडला. या वेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे उपस्थित होते. कलानगर येथील मातोश्री बंगल्याबाहेर आल्यानंतर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी फुले उधळून ठाकरे यांचे स्वागत केले.
सकाळी राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकच्या सुमारास पत्रकारांना ही माहिती दिली. यामुळे काँग्रसचे निरीक्षक कमलनाथ यांना उद्धव यांची भेट घेता आली नाही. दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते.