गेली अडीच वर्षे राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्याच्या राजकीय पेचात सक्रिय झाले आहेत. ४७ आमदारांची घरे आणि कार्यालय येथे केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्याची मागणी त्यांनी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे काही राजकीय नेते चिथावणीखोर वक्तव्ये करीत असून मी आदेश देऊनही पोलिस ‘बघ्याची भूमिका’ घेत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केंद्र सरकारला पाठवलेल्या या लेखी पत्रात केला आहे. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने तातडीने हालचाल करीत १५ बंडखोर आमदारांना रविवारी ‘वाय प्लस’ सुरक्षा पुरवली आहे. तसेच त्यांच्या घरांभोवती केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय सुरक्षा दलांकडून शिफारस प्राप्त झाल्यानंतर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला.
कोरोना संसर्ग झाल्याने गेले आठवडाभर राज्यपाल कोश्यारी मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल होते. रविवारी त्याना रुग्णालयातून सुटी मिळाली. मात्र शनिवारपासूनच ते सक्रिय झाले आहेत. काही राजकीय नेत्यांची प्रक्षोभक वक्तव्ये, धमक्या पाहता आमदार आणि त्यांचे कुटुंबीय, घरे यांना सुरक्षा पुरवण्यात यावी, असे निर्देश राज्य पोलिसांना दिले आहेत. तरीही काही आमदारांची कार्यालये फोडण्यात आली त्या वेळी राज्य पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे केंद्रीय दलाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात यावी, असे पत्र राज्यपालांनी दिले आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी शनिवारी २५ जूनला रुग्णालयातून ५ पत्रे लिहिली आहेत. त्यातील ४ पत्रे मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे, राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ, गृह विभागाचे अतिरिक्त सचिव आनंद लिमये आणि मुख्य सचिव मनु श्रीवास्तव यांना पाठवली आहेत तर पाचवे पत्र केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांना पाठवले आहे. यापैकी राज्यातील अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रांमध्ये आमदारांच्या कुटुंबांना सुरक्षा देण्याबाबत ‘मार्गदर्शक सूचना’ देण्यात आल्या आहेत. तर, केंद्र सरकारच्या गृह सचिवांना पाठवलेल्या पत्रात ‘माझ्या सूचनेनंतरही’ हल्ले सुरू आहेत असा बदल करून राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचा पुरावा तयार करण्यात आला आहे