मुंबई ब्युरो : राज्यात नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर नुकताच मंत्री मंडळ विस्तार देखील झाला आहे. यानंतर भाजपात संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. चंद्रकांत दादा पाटील आणि मंगल प्रभात लोढा यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आल्यानंतर, आता महाराष्ट्र प्रदेश भाजपा आणि मुंबई भाजपाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या बदलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आले आहे. तर मुंबई भाजपाचे अध्यक्षपद पुन्हा एकदा माजी शिक्षणमंत्री आणि वांद्रे पश्चिमचे आमदार आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आले आहे.
भाजपाच्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नवी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. भेट घेऊन दोघांचेही आभार मानले असल्याचे बावनकुळे यांनी सांगीतले.