स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नागपूर शहराच्या इतिहासाला उजळणी देणाऱ्या फ्रीडम पार्कची निर्मिती नागपुरात करण्यात आली आहे. हे फ्रीडम पार्क इथे येणाऱ्या सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
नागपुरातील महामेट्रो झिरो माईल स्टेशन परिसरात चाळीस हजार चौरस फुटांमध्ये फ्रीडम पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. पार्कच्या माध्यमातून देशाच्या व शहराच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे हे पार्क आहे. याठिकाणी दररोज अनेक लोकं फॅमिलीसह येतात.
भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याने सर्व देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. याच अमृत वर्षानिमित्त महामेट्रोच्या वतीने नागपूर शहराच्या इतिहासाला उजळणी देणाऱ्या फ्रीडम पार्कची निर्मिती नागपुरात करण्यात आली आहे. आपल्या नैसर्गिक सुंदरतेमुळे हे स्थान आता नागपूरकरांना खूपच आवडायला लागले आहे.
फ्रीडम पार्क येथे हिस्ट्री वॉलची निर्मिती करण्यात आली आहे. या भिंतीच्या कोनशिलात नागपूर शहराच्या निर्मितीचा आणि नागपुरातील प्रमुख ऐतिहासिक वास्तूंचा इतिहास सांगणाऱ्या दगडी शिळा देखील लावण्यात आल्या आहे.
शहरांतील तरुणांना हक्काचा मंच उपलब्ध व्हावा, मनोरंजनाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम घेता यावे यासाठी नागपूर महा मेट्रोच्या वतीने फ्रीडम पार्कमध्ये भव्य असे प्रेक्षागृह सुद्धा तयार करण्यात आले आहे.
फ्रीडम पार्क शहराच्या अतिशय वर्दळीच्या ठिकाणी आहे. फ्रीडम पार्कमध्ये निवांत बसून काही वेळ घालवता यावा यासाठी आसन व्यवस्था आणि गार्डनची निर्मिती करण्यात आली आहे. फ्रीडम पार्कमध्ये नागपूर मेट्रोची प्रतिकृती उभारण्यात आली असून त्यात नागपूर महामेट्रोबद्दल माहिती देणारे माहिती केंद्र सुरू करण्यात आले आहे.
फ्रीडम पार्क हे अगदी झिरो माईल मेट्रो स्टेशनला लागूनच असल्याने येथे नागपूर मेट्रो द्वारा आपण सहज पोहचू शकतो. पार्कमध्ये प्रवेश विनामूल्य उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवेश शुल्काची चिंता नको. सोबतच याठिकाणी पार्किंग सुद्धा सहज करता येते.

Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur
मध्यम टँक टी-55 ने 1971 च्या बांग्लादेश मुक्तीसाठी लष्करी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली होती. हा टँक देखील पार्कमध्ये ठेवण्यात आला आहे. इथे येणाऱ्या बाळ गोपाळांना या टॅंक चे विशेष आकर्षण आहे.