Home Nagpur #Nagpur | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी यावी:नागपुरात आम आदमी पार्टीचा यज्ञ,...

#Nagpur | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी यावी:नागपुरात आम आदमी पार्टीचा यज्ञ, बेरोजगारांसाठी भीकमांगो आंदोलन

407
वेदांता-फोक्सकाॅन प्रकल्पानंतर टाटा एअरबसचा प्रकल्पही गुजरातला गेला. राज्यातील अनेक महत्वाचे प्रकल्प गुजरातला जात आहेत. हे लक्षात घेता आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी यावी, यासाठी आम आदमी पार्टीने रविवारी सकाळी संविधान चौकात यज्ञ करीत प्रार्थना केली.

मिहान मधील टाटा एअरबस प्रोजेक्ट गुजरातमध्ये नेण्यात आला आहे. मिहानमधील प्रोजेक्ट विदर्भात असायला पाहिजे होता. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी यावी, म्हणून आम आदमी पार्टीने यज्ञ केला.

नागपुरातील रोजगार गुजरातमध्ये गेला आहे. त्यामुळे नागपुरातील सुशिक्षित युवकांवर भिक मागायची वेळ आली आहे, अशी टीका करत आम आदमी पार्टीने भीक मांगो आंदोलनदेखील केले. आपचे विदर्भ माध्यम प्रमुख भूषण ढाकुलकर यांनी सांगितले की, एका पाठोपाठ एक प्रकल्प राज्याबाहेर चालल्याने बेरोजगारांमध्ये नाराजी आहे. यातील काही प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये होणार होते. त्यामुळे येथे रोजगार निर्मिती झाली असती आणि स्थानिकांना रोजगार मिळाला असता. परंतु प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे ही संधी हिरावल्या गेली आहे. म्हणून भीकमागो आंदोलन करण्यात आले आहे.

विदर्भात होणारे अनेक प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याने सध्या रोष व्यक्त केला जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीची आंदोलने सुरू आहे. नागपुरात युवक काँग्रेसने आक्रमक हाेत शनिवारी मुख्यमंत्री निवास असलेल्या रामगिरीचा फलक बदलवण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी ताे हाणून पाडला. नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांना रोखताना पोलिसांसोबतही धक्काबुक्कीची घटना घडली.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी उद्या सोमवार ३१ ऑक्टोबर रोजी आंदोलन जाहीर केले आहे. मात्र स्थळ सांगितलेले नाही. या शिवाय काँग्रेस विचार जनजागृती अभियानातर्फे व्हेरायटी चौकातील गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. शिवसेना ठाकरे गटही आंदोलनाच्या तयारीत आहे.