Home Health #Nagpur । नागपुरात आतापर्यंत 62 रुग्णांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू; नागरिकांना काळजी घेण्याचे...

#Nagpur । नागपुरात आतापर्यंत 62 रुग्णांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

394

सध्या सगळीकडे स्वाईन फ्लूची साथ सुरू आहे. अशातच नागपूर शहरात शुक्रवारी स्वाईन फ्लूच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या कक्षात स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीची बैठक पार पडली.

बैठकीमध्ये नागपूर शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये दाखल संशयित स्वाईन फ्लू रुग्ण व त्यातील बाधित या सर्वांचा आढावा घेण्यात आला. समितीसमोर एकूण 2 स्वाईन फ्लू संशयित रुग्णांच्या मृत्यू विषयी माहिती ठेवण्यात आली. त्याचे विश्लेषण केले असता 2 मृत्यू स्वाईन फ्लूमुळे झाल्याचे विश्लेषणातून स्पष्ट झाले. यात नागपूर शहरातील 66 वर्ष व 72 वर्षाच्या महिला आहेत.

नागपूर शहरात आतापर्यंत 654 स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी मनपा हद्दीतील 21, जिल्हा क्षेत्रातील 9, नागपूर जिल्ह्याबाहेरील 18 आणि इतर राज्यातील 14 असे एकूण 62 रुग्ण स्वाईन फ्लूमुळे मृत्यूमुखी पडले आहेत. स्वाईन फ्लू बाधित रुग्णांपैकी नागपूर शहरातील 354, नागपूर ग्रामिण मधील 114 आणि जिल्ह्याबाहेरीत 186 अशा एकूण 654 स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद आहे. तसेच 576 रुग्ण स्वाईन फ्लूमुक्त होऊन सुखरूप घरी पोहोचले.

सर्दी-पडसे, घसा दुखणे, अंगदुखी यासारखी फ्लू सदृष्य लक्षणे दिसून आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेउन त्यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावा. वेळीच औषधोपचार आणि योग्य काळजी घेतल्यास स्वाईन फ्लूवर मात करणे सहज शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करणे टाळावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात आले आहे. वेळीच सतर्कता दाखवून वैद्यकीय उपचार घेतल्यास स्वाईन फ्लू वर मात करणे शक्य आहे. स्वाईन फ्लूची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने सुरक्षात्मक काळजी घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

बैठकीत समितीचे अध्यक्ष मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, समितीचे सदस्य इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) चे सहायक प्राध्यापक डॉ. प्रवीण सलामे, मनपाचे स्वाईन फ्लू कार्यक्रम नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, डॉ. अंजुम बेग, सदर रोग निदान केन्द्र, डॉ. संजय गुज्जनवार वैद्यकीय अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय आदी उपस्थित होते.