नागपूर ब्यूरो : माहे नोव्हेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ अखेर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नागपूर तर्फे “मंडणगड योजना” प्रमाणे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नागपूर, यांचे वतीने वर्ग १२ वी व १९ विज्ञान शाखेतील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता प्रस्ताव पाठविणेबाबत तसेच ऑनलाईन पध्दतीने जात वैधता प्रमाणपत्र सुलभ रितीने कसे प्राप्त करावे याबाबत नागपूर जिल्हयातील विविध महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष जावून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे वतीने “मंडणगड योजना” योजना जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात येत आहे.
“मंडणगड योजना” प्रमाणे विशेष मोहीमेअतंर्गत नागपूर जिल्हयातील ३८४ शाळा व महाविद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक आणि नोडल अधिकारी यांचे ऑनलाईन वेबीनार दि. २४ नोव्हेंबर २०२२ व दि. २५ नोव्हेंबर रोजी ४ टप्प्यात आयोजित केले होते. या वेबीनारमध्ये मंडणगड पॅटर्न १२ वी व ११ वी चे अर्ज मुदतीत सादर करणे, नोडल अधिकारी यांची भूमिका काय याबाबत समितीचे अध्यक्ष सचिन कलंत्रे व उपायुक्त सुरेंद्र पवार यांनी मार्गदर्शन केले त्यामध्ये समता पर्व आणि मंडणगड योजनाबाबत माहीती दिली व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. सदर वेबीनारला नागपूर जिल्हयातील ३८४ महाविद्यालयातील नोडल अधिकारी व संबंधित कामकाज बघणारे कर्मचारी उपस्थित होते.
सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थ्यांचे पालक यांनी १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे त्यांचे अर्ज ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत संबंधित महाविद्यालयात सादर करावे. संबंधित महाविद्यालयाने तात्काळ अर्ज जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करावे तसेच वर्ग १९ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज दि. १ जानेवारी २०२३ पासून ३१ मार्च २०२३ पर्यंत महाविद्यालयात जमा करावे. सर्व कागदपत्रे साक्षांकीत असावी. मुळ कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावे, खोटी कागदपत्रे सादर करू नये याचीसूध्दा नोंद पालकांनी व महाविद्यालयांनी घ्यावी. असे सुरेंद्र पवार, उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नागपूर हे कळवितात.