खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा ‘राममय’ दुसरा दिवस
नागपुर ब्यूरो: रामकथा विभक्त होऊन नव्हे तर भक्त होऊन श्रवण करावी. मी विज्ञानाचा विद्यार्थी असून सांगतो की राम कथेने अभूतपूर्व उत्साह संचारतो, असे प्रतिपादन विश्व विख्यात कवी, मोटिव्हेशनल स्पीकर, विविध कला निपुण डॉ. कुमार विश्वास यांनी येथे केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कलागुणांचा संगम असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या आज, दुसऱ्या दिवशी ‘अपने अपने राम’ अंतर्गत मर्मज्ञ प्रवचन देताना ते बोलत होते. हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
डॉ. कुमार विश्वास पुढे म्हणाले की, रामकथेत अमृततत्त्व आहे. हे मनभावन पवित्र चरित्र प्रत्येकवेळी नवसंजीवनी देते. नागपूर राष्ट्रवादाच्या संकल्पनेचे तीर्थ आहे, श्रीराम त्या राष्ट्रवादाचे उगमेंद्र पुरुष आहेत. मुलांना हॅरी पॉटर एव्हजी सिद्ध पुरुषार्थ रामाची कहाणी सांगावी. राघवेंद्रचे अवर्णनीय वर्णन असलेल्या सुमधुर, उर्जादायी गीते, कवनांनी ही अनोखी रामकथा उत्तरोत्तर फुलत गेली. राम, कृष्ण आपले सामूहिक पूर्वज आहेत, राम जातीधर्माच्या वर आहेत. रामावर लिहिण्याचा मलाही अधिकार आहे असे डॉ. कुमार विश्वास यांनी नम्रपणे नमूद केले.
तत्पूर्वी, संस्कार भारतीच्या प्रमुख कांचन गडकरी, एअर मार्शल संजीव घुराटीया, उद्योगपती सत्यनारायण नुवाल, नवभारतचे प्रबंध संपादक निमेश माहेश्वरी, मधूलिका मधूप पांडेय, लोकमतचे संपादक श्रीमंत माने, तरुण भारतचे संपादक गजानन निमदेव, सुधाकर कोहळे, उपेंद्र कोठेकर, दीनानाथ पडोळे, गिरीश व्यास आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे माजी उपाध्यक्ष हास्य कवी स्व. मधूप पांडेय याच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली, ‘अपने अपने राम’ हा कार्यक्रम त्यांना समर्पित करण्यात आला. प्रारंभी डॉ. कुमार विश्वास यांच्या चमुतील नीरजा, प्रियांक शाह, अंकिता, विरेन यांनी सुमधुर रामधून सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर, कविता तिवारी आणि बाळ कुळकर्णी यांनी केले.
महोत्सवाच्या सफलतेसाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, डॉ. दीपक खिरवडकर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, ऍड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर, विजय फडणवीस, महेंद्र राऊत, दिलीप गौर, शैलेश ढोबळे यांचे सहकार्य लाभत आहे.
विलोभनीय, मंगल मंच सजावट
राम आराध्य भी है, राम आराधना भी है
राम साध्य भी है, राम साधना भी है
या ओळींना साजेशी, अयोध्येच्या राम मंदिराचा आभास निर्माण करणारी सुंदर, विलोभनीय मंच सजावट आज करण्यात आली होती. त्यात प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मणाची कोदंडधारी मूर्ती विराजमान होती. मंचावरील या उत्फुल्ल देखाव्याने महोत्सवात मांगल्य पसरले.
आज महोत्सवात……
सकाळी ७ वा. भक्तिमय वातावरणात श्री रामरक्षा स्तोत्र, श्री मारुती स्तोत्राचे सामूहिक पठण व सायं. ६ वा. ‘अपने अपने राम’ अंतर्गत डॉ. कुमार विश्वास यांचे मर्मज्ञ प्रवचन.