Home हिंदी कोव्हिड संवाद : मुलांबरोबर ‘क्वालिटी टाईम’ घालवा

कोव्हिड संवाद : मुलांबरोबर ‘क्वालिटी टाईम’ घालवा

817

डॉ.उदय बोधनकर आणि डॉ.जयश्री शिवलकर यांचा सल्ला

नागपूर ब्यूरो : कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच लहान मुले, किशोर आणि कुमारांच्या आयुष्यातही मोठा बदल झाला आहे. शाळा, कॉलेज, ट्यूशन बंद झाल्याने मुले घरीच आहेत. अशात त्यांची मोबाईल, टिव्हीची वेळही वाढली आहे. काहींना त्याचे व्यसन जडले आहे. त्याचे विपरित परिणाम पुढे सहन करावे लागणार आहेत. एकीकडे कोरोनामुळे घरातील मोठी मंडळी ताणतणावात आहेत तर मुलेही अनेक विचारांमध्ये दंग आहेत. कोरोना हे संकट जरी असले तरी ते मुलांच्या विकासासाठी, त्यांच्या उन्नतीसाठी वेळ देण्याची मोठी संधी आहे. त्यादृष्टीने या संधीचा उपयोग करा. कोरोनाने कुटुंबासोबत वेळ घालवण्याची उत्तम संधी उपलब्ध केली आहे. त्याचे सोने करीत मुलांच्या विकासासाठी, त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांना गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी त्यांच्याशी ‘क्वालिटी टाईम’ घालवा, असा मोलाचा सल्ला सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.उदय बोधनकर आणि प्रसिद्ध बालमानसोपचारतज्ज्ञ डॉ.जयश्री शिवलकर यांनी दिला.

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (आय.एम.ए.) यांच्या संयुक्त विद्यमाने महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतील ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात मंगळवारी (ता.12) डॉ.उदय बोधनकर, डॉ.जयश्री शिवलकर आणि सोहम फाउंडेशनचे अध्यक्ष संजय अवचट यांनी ‘कोव्हिड काळात बालकांचे लसीकरण आणि मुलांचे मानसिक आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसरन केले.

देशात दरवर्षी सुमारे 5 लाख बालके लसीकरणाअभावी दगावतात. कोव्हिडच्या काळात लसीकरण न झालेल्या बालकांची संख्या मोठी आहे आणि हे अत्यंत धोकादायक आहे. आज नागपूर शहरामध्ये मोफत लसीकरणासाठी 50 केंद्र आहेत त्यांचा लाभ घ्या. बाळ जन्मत:च त्याला टी.बी.ची लस दिली जाते ती कुठल्याही कारणाने चुकली असल्यास 5 वर्षाच्या आत ती बाळाला देणे आवश्यक आहे. याशिवाय पोलिओची लसही महत्वाची आहे. मिझल्स रुबेला (एमआर), रोटा या लसीही बालकांना देणे अत्यावश्यक आहे. वैद्यकीय अभ्यासानुसार ज्या बालकांना या सर्व लस वेळेवर देण्यात येत आहेत त्यांना कोरोनाचा धोका कमी असल्याचे दिसून आले असल्याची माहिती यावेळी डॉ. उदय बोधनकर यांनी दिली. लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांसाठीही काही लस महत्वाच्या आहेत त्यासुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.

डॉ.जयश्री शिवलकर यांनी मुलांची मानसिकता आणि त्यासाठी घ्यावयाची काळजी यासंदर्भात मार्गदर्शन केले. लहान मुलांना मोबाईल, टिव्हीने वेड लावले आहे तर पदवीतील मुलांना परीक्षा, स्पर्धा परीक्षा, नोकरी यामुळे नैराश्याचा सामना करावा लागत आहे. परिणामी ते टोकाचे पाउल उचलतात. वयात येणा-या मुलांमध्येही अनेक बदल झपाट्याने होत आहेत. त्यामुळे पालकांनी आजच्या काळात स्वत:ची, कुटुंबाची काळजी घेतानाच मुलांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांचे बोलणे, वागणे याकडे लक्ष द्या, त्याचे निरीक्षण करा. सद्याच्या काळात मुलांचे मित्र बनून त्यांची जीवनशैली सुलभ करण्याकडे भर द्या. घरातील वातावरण हसतखेळत ठेवा. घरीच प्राणायाम, योगा करा. मुलांच्या आवडी निवडी जोपासा. संगीताची आवड असल्यास घरीच गाणी म्हणा, डान्स करा मुलांना त्यांचा मोकळा वेळ त्यांच्या विकासासाठी देण्यात यावा. आजच्या काळात ‘इमोशनल व्हॅक्सिन’ मुलांसाठी महत्वाचे आहे, असेही त्या म्हणाल्या.

सोहम फाउंडेशनचे संजय अवचट यांनी विशेष मुलांच्या मानसिकतेबाबत मार्गदर्शन केले. विशेष मुलांबाबत अनेकांचा समज चुकीचा असतो. तो योग्य नाही. विशेष मुले एकाच कामावर एकाग्र असल्याने त्यांची बुद्ध्यांक पातळी ही सर्वसामान्यांपेक्षा उत्तम असते. अशी मुले संशोधकही झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे अशा मुलांचा तिरस्कार करण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा योग्य सल्ला घेउन त्यांच्यावर उपचार सुरू ठेवा. त्यांच्याशी मोकळेपणाने वागा. कोरोनाच्या या संकटात अनेक बाबी विशेष मुलांवरही परिणाम करित आहेत. अशा मुलांच्या विकासासाठी शहरातील मेयो, मेडिकल आणि एम्समध्ये अध्ययन अक्षमता आणि बौद्घिक अक्षमता केंद्र सुरू करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

कोरोनाची लस येईल ही वाट पाहत बसण्यापेक्षा सर्वांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याची सवय लावून घेणे आजची गरज आहे. दररोज व्यायाम करा, योगा करा, सकस आहार घ्या आणि सकारात्मक राहा. पालकांनी मुलांची आणि मुलांनी आजी-आजोबांची काळजी घेत घरीच राहा, असा सल्लाही यावेळी डॉ.उदय बोधनकर, डॉ.जयश्री शिवलकर आणि संजय अवचट यांनी दिला.