Home हिंदी नागपूर न्यूज बुलेटिन : लकडगंज कडबी बाजार ची लिज तपासणीसाठी समिती

नागपूर न्यूज बुलेटिन : लकडगंज कडबी बाजार ची लिज तपासणीसाठी समिती

753

लकडगंज कडबी बाजार खुले मैदान आणि भूखंड क्रमांक 115 , 116 च्या जागेची लीज, अतिक्रमण आणि लीज नूतनीकरणाच्या कार्यवाहीच्या तपासणीसाठी समिती नियुक्त करण्यात आली असून ही समिती संपूर्ण तपासणी करून अतिक्रमण काढण्याची कार्यवाही तत्काळ करण्याचे निर्देश मनपा विधी समितीचे सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिले.

विधी समितीची ऑनलाईन बैठक शुक्रवारी (ता. 16 ) पार पडली. विधी समितीचे सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला उपसभापती ॲड. मिनाक्षी तेलगोटे, सदस्य जयश्री वाडीभस्मे, सुमेधा देशपांडे, मनिषा धावडे, मंगला लांजेवार, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त महेश धामेचा, सहायक आयुक्त अशोक पाटील, सहा आयुक्त साधना पाटील, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, स्थावर अधिकारी राजेंद्र अंबारे, प्रभारी आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी यांची उपस्थिती होती.


बैठकीत अनुपस्थित अधिका-यांना कारण दाखवा नोटिस

महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांनी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 52, 53(ए), 54, 55, व 56 अंतर्गत बांधकामाचे नकाशे मंजूर करण्यासंदर्भात महापौर संदीप जोशी व्दारे गठित समितीची बैठक शुक्रवारी (16 ऑक्टोंबर) ला डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडली. या बैठकीची अध्यक्षता, स्थायी समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके यांनी केली. बैठकीत ‍काही अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे अधिका-यांना कारणे दाखवा नोटिस जारी करण्याचे निर्देश झलके यांनी दिले.

झलके यांनी दुपारी 12 वाजता बैठकीचे आयोजन केले होते. याची सूचना सर्व संबंधीत विभागांना देण्यात आली होती तरी पण अधिकारी वेळेवर उपस्थित नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच बैठकीचे सदस्य्, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांना अनुपस्थित अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे त्यांनी निर्देश दिले. या बैठकीत विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, स्थापत्य व प्रकल्प समितीचे सभापती अभय गोटेकर, बसपा पक्षनेता वैशाली नारनवरे उपस्थित होते.


मास्क न लावणा-या 261 नागरिकांकडून दंड वसूली

नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी (16 ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार 261 नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये 500 प्रमाणे 1 लक्ष 30 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी 12575 नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. 46,46,500/- चा दंड वसूल केला आहे.

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत 57, धरमपेठ झोन अंतर्गत 73, हनुमाननगर झोन अंतर्गत 31, धंतोली झोन अंतर्गत 12, नेहरुनगर झोन अंतर्गत 14, गांधीबाग झोन अंतर्गत 17, सतरंजीपूरा झोन अंतर्गत 12, लकडगंज झोन अंतर्गत 11, आशीनगर झोन अंतर्गत 20, मंगळवारी झोन अंतर्गत 10 आणि मनपा मुख्यालयात 4 जणांविरुध्द शुक्रवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. 500 रुपये प्रमाणे आतापर्यंत 7105 बेजबाबदार नागरिकांकडून रु 35 लक्ष 52 हजार 500 वसूल करण्यात आले आहे.