Home Health Bird Flu | परभणीत बर्ड फ्लू; नागपूर, बीड, लातूरचे अहवाल प्रतिक्षेत

Bird Flu | परभणीत बर्ड फ्लू; नागपूर, बीड, लातूरचे अहवाल प्रतिक्षेत

618

मुंबई ब्यूरो : राज्य अगोदरच कोरोनाच्या संकटाशी सामना करत आहे, अशातच आता नवीन संकट उभं राहिलंय, ते बर्ड फ्लूच्या रूपात. परभणीच्या मुरुंबा गावातील 800 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाला असल्याचं स्पष्ट झालं असून बीड, नागपूरच्या कोंढाली आणि लातूर मधील अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहेत. दरम्यान राज्य शासनाने या घटनेनंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम नियुक्त केल्या आहेत. तसचे ग्रामपंचायत, वन विभाग, पाटबंधारे विभाग पातळींवर निगराणीचे आदेशही दिले आहेत.

परभणीतील घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ पावलं उचलायला सुरुवात केली आहे. मुरुंबा गाव परिसरातील 1 किलोमीटर मधील पाळीव पक्षी नष्ट केले जाणार आहेत. याशिवाय 10 किलोमीटरच्या परिसरात सर्व प्रकारच्या पक्ष्यांची ने-आण, खरेदी-विक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. गावातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिली आहे. दरम्यान जिल्ह्यात कुठेही अशा प्रकारच्या घटना घडल्या तर तत्काळ पशुसंवर्धन विभागाला कळवण्याचे आवाहनही प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

चिकन आणि अंडी खाण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत

स्थानिक पातळीवर बर्ड फ्लू हा रोग नियंत्रात आणणं शक्य आहे. पशुसंवर्धन विभाग उपाययोजना करत आहे. उर्वरीत महराष्ट्रात चिकन आणि अंडी खरेदी विक्रीवर आणि खाण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. तसेच अशी आवश्यकताही नाही, असं पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

मुरुंबा गाव संसर्गित

परभणी तालुक्यातील मुरुंबा येथील मृत्यु पावलेल्या त्या 800 कोंबड्याचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याची माहिती समोर येत आहे. हा अहवाल भोपाळ येथील प्रयोग शाळेने जिल्हा प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे मुरुंबा गाव संसर्गित झाल्याचे जाहीर करून बर्ड फ्लूच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याची कारवाई उद्यापासून करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान,गावात उपाययोजना करण्यात येत आहेत. एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले असून गावातील दहा किलोमीटर परिसरात कुकूट पक्ष्यांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार आणि जत्रा, प्रदर्शन तसेच पशुपक्ष्यांच्या अवागमनास बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.