मुंबई ब्यूरो : पतंगाचा मांजाने गळा चिरल्याच्या काही घटना गेल्या काही दिवसात समोर आल्या आहेत. त्यातच आता मुंबईच्या एका पोलीस अधिकाऱ्याचा गळा मांजामुळे चिरल्याची घटना समोर आली आहे. मुंबईच्या वरळी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश गवळी असं या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. या घटनेत ते अगदी थोडक्यात बचावले आहेत.
16 जानेवारी रोजी वरळी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश गवळी हे आपल्या दुचाकीवरून सेशन कोर्टात जात होते. मात्र जेजे जंक्शन येथे पोहचताच अचानक एक मांजा राकेश गवळी यांच्या गळ्यात अडकला आणि त्यांचा गळा चिरला गेला. तेथे उपस्थित असलेल्या ट्रॅफिक हवालदार शिंदे यांनी तात्काळ याची माहिती वरिष्ठांना दिली आणि जवळ असलेल्या जेजे रुग्णालयात त्यांना नेलं. परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त परमजीत सिंह दहिया यांनी तात्काळ उपचार व्हावे यासाठी गवळी यांना वोकहार्ट रुग्णालयात दाखल करून घेतल. आणि प्लास्टिक सर्जन बोलवून तात्काळ उपचार सुरू केले. राकेश गवळी यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचवण्यात आले. राकेश गवळी अगदी थोडक्यात बचावले असून त्यांच्या गळ्याला 10 टाके पडले असून त्यांचा आवाज ही थोडक्यात बचावल आहे.
परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त परमजीत सिंह दहिया यांनी जातीने लक्ष घालून सर्व उपचार नीट करून घेतले आणि नेहमी राकेश गवळी यांच्या ताब्येतीची विचारपूस करण्यासाठी डॉकटरांच्या संपर्कात होते. राकेश गवळी यांना वेळेत रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांचा जीव वाचवण्यात मदत झाली. तर त्यांची स्वरपेटी सद्धा थोडक्यात वाचली आहे. एमआरए पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली असून या संदर्भात गुन्हा नोंदवला जाण्याची शक्यता आहे. मात्र राकेश गवळी यांना काही दिवस बोलण्यास डॉक्टरांनी मनाई केली असून त्यांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे आता पतंगबाजांवर आळा बसवण्यासाठी कडक नियमावली नियम घालण्याची गरज आहे.