Home Education Nagpur | विदर्भातील विद्यार्थ्यांचे हात गुंतले उपग्रह निर्मितीत

Nagpur | विदर्भातील विद्यार्थ्यांचे हात गुंतले उपग्रह निर्मितीत

682

रामेश्वरम् येथून 7 फेब्रुवारीला शंभर उपग्रहांचे प्रक्षेपण


नागपूर ब्यूरो : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या पुढाकाराने अवकाश संशोधनासाठी शंभर उपग्रहाची निर्मिती करण्याच्या उपक्रमात विदर्भातील 160 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. आज या विद्यार्थ्यांनी शहरातील व्हिन्सेंट पल्लोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे आयोजित कार्यशाळेमध्ये उपग्रहांची बांधणी केली. विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे या विद्यार्थ्यांमध्ये गडचिरोली येथील अतिदुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

स्पेस रिसर्च पेलोड क्युब्ज चॅलेंज-2021 स्पर्धेत देशातून एक हजार विद्यार्थी तर राज्यातून 375 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यापैकी 160 विद्यार्थी विदर्भातील आहेत. यात महापालिका शाळा, जिल्हा परिषद शाळा, आदिवासी आश्रम शाळा, धारावी झोपडपट्टीतील विद्यार्थी तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, भंडारा जिल्ह्यातील लाखनी, तुमसर (मांडवी), यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, नेर, गोंदिया जिल्ह्यातील देवरी, साकोली, सालेकसा, मुरदोली, दरेकसा यासारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी उपग्रहाची बांधणी केली.

रामेश्वरम् येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनद्वारा ही अभिनव कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी 25 ते 80 ग्रॅम वजनाचे उपग्रह तयार केले असून त्याची चाचणीही घेतली. या प्रकल्पाची नोंद जागतिक, आशियाई तसेच राष्ट्रीय स्तरावरील विक्रमासाठी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या जगातील सर्वात कमी म्हणजे 25 ते 80 ग्रॅम वजनाचे शंभर उपग्रहांचे प्रक्षेपण रामेश्वरम् येथे एकाचवेळी करण्यात येईल. या उपग्रहांना 35 हजार ते 38 हजार मीटर उंचीवर हाय अल्टीट्यूड सायंटिफिक बलूनमार्फत प्रक्षेपित करण्यात येतील.

हे संपूर्ण उपग्रह एका स्पेसमध्ये बसविण्यात येतील. यासोबतच पॅराशुट, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम, लाईव्ह कॅमेरा जोडलेला असेल. तेथून प्रत्यक्ष ओझोन, कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण आणि इतर माहिती हे उपग्रह पृथ्वीवरील केंद्राला पाठवतील. उपग्रहासोबतच सात-आठ प्रकारच्या वनस्पतींच्या बियाही पाठविण्यात येणार आहे. अंतराळातून परत आल्यानंतर या बियांवर काय परिणाम झाला, याचाही अभ्यास करण्यात येणार आहे. प्रक्षेपण करुन परत उपग्रह जमिनीवर येईपर्यंत 5 ते 8 तासांचा अवधी लागेल. विद्यार्थ्यांना उपग्रहाचे प्रक्षेपण, उपग्रह पाठवित असलेली माहिती घरी बसून ऑनलाईन बघता येईल.

हा प्रकल्प डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन, स्पेस झोन इंडिया तसेच चेन्नई येथील मार्टीन ग्रुप यांच्या सहकार्याने घेण्यात येत आहे. हा प्रकल्प भारत रत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचाराने प्रेरित होऊन विद्यार्थ्यांमध्ये अवकाश संशोधनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी राबविण्यात येत आहे. अशी माहिती फाऊंडेशनचे सरचिटनीस मिलिंद चौधरी तसेच महाराष्ट्र समितीचे सभासद डॉ. विशाल लिचडे यांनी दिली आहे.