नागपूर ब्यूरो: नागपूर येथे विदर्भ सिंचन विकास महामंडळ, नागपूर कॉन्टॅक्टर ॲन्ड बिल्डर्स असोसिएशन ॲाफ विदर्भ आणि डॉ. दंदे फाऊंडेशन यांच्या मदतीने अजनी येथील प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रात १०० बेड्सचे मोफत कोविड केअर सेंटर उभारले आहे.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे वैनगंगा नगर अजनीत कार्यालय आहे. या कार्यालयाच्या आवारात काही इमारती सध्या रिकाम्या आहेत. त्यांचा उपयोग कोरोना बाधितांसाठी झाला तर नक्कीच त्यांना दिलासा मिळेल. म्हणून प्रवीण महाजन यांनी याची कल्पना जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांना सांगितली. त्यानुसार कॅान्ट्रक्टर बिल्डर्स असोशिएशन ॲाफ विदर्भ, दंदे फाऊन्डेशन व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांचे संयुक्त पुढाकाराने 100 खाटांचे कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.
या केंद्रात ज्यांना विलगीकरणात राहायचे त्यांना ठेवले जाईल. काही खाटा ऑक्सिजनयुक्त राहतील. विशेष म्हणजे या केंद्रात विलगीकरणात राहणार्यांना चहा, नाश्ता आणि दोन वेळचे जेवण एवढेच नव्हे तर शुद्ध पाणी पूर्णत: मोफत दिले जाणार आहे, असा दावा प्रवीण महाजन यांनी केला आहे. दरम्यान येथील कोरोना बाधितांना वैद्यकीय उपचार करण्यासाठी डॉ. दंदे फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. त्यांचे सहा डॉक्टर 15 परिचारिका आणि इतर कर्मचारी चोवीस तास सेवेत राहतील अशी माहिती डॉ. पिनाक दंदे यांनी दिली. प्रवीण महाजन यांनी येथे संपर्क करण्यासाठी +91 84840 16274 हा नंबर दिलेला आहे.