नागपूर ब्युरो : महाराष्ट्राच्या विदर्भात 12 ते 14 जूनदरम्यान मॅान्सूनचं आगमन होणार आहे. नागपूर हवामान विभागानं असा मॅान्सुनचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने मान्सूनचा एकंदरित अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार यंदा मान्सून काळात देशात सरासरीच्या 101 टक्के तर विदर्भात 106 टक्के पर्जन्यमानाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
यंदा मान्सून 30 मे रोजी केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, काही कारणांमुळे मान्सून आगमनाला उशीर झाला आहे. मान्सूनच्या आगमनाला उशीर होत असून गेल्या पंधरा दिवसात दोन चक्रीवादळांनी हजेरी लावली आहे. याचा विपरित परिणाम मान्सूनवर परिणाम होणार का? अशी चिंता सतावत होती. मात्र, हवामान खात्याने मंगळवारी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार यंदा देशात पावसाची स्थिती उत्तम राहणार आहे.
यंदा देशात मान्सून काळात सरासरीच्या तुलनेत 101 टक्के पर्जन्यमानाची अपेक्षा आहे. मध्य भारतात तर 106 टक्के पर्जन्यमानाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भातसुद्धा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाच्या 4 टक्के कमी अधिक प्रमाणात पाऊस होतो. त्यामुळे यंदा विदर्भात नक्कीच सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातून करणार प्रवेश
नागपूर हवामान विभागानं असं देखील म्हट्लं आहे की गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातून मॅान्सुन विदर्भात प्रवेश करणार. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण विदर्भात धानाची शेती केली जाते. याकरिता चांगला पाऊस लागतो. आजपासून विदर्भाच्या बऱ्याच भागात पुर्वमौसमी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. 11 तारखेला पूर्व विदर्भात चांगला पाऊस पडणार असे देखील हवामान विभागानं म्हटले आहे.