Home मराठी “सोयामिल्क मॅन”। शांतीलाल कोठारी यांचे निधन; लाख-लाखोळीवरील बंदी उठावी यासाठी दिला होता...

“सोयामिल्क मॅन”। शांतीलाल कोठारी यांचे निधन; लाख-लाखोळीवरील बंदी उठावी यासाठी दिला होता लढा

नागपूर ब्युरो : अॅकॅडमी आॅफ न्यूट्रीशन इम्प्रुव्हमेंटचे अध्यक्ष व ख्यातनाम आहार तज्ज्ञ डाॅ. शांतीलाल कोठारी यांचे मंगळवार, 27 रोजी निधन झाले. लाखोळी डाळ खुल्या बाजारात िवक्रीला यावी आणि या डाळीवरील बंदी उठावी म्हणून त्यांनी 40 वर्षे लढा दिला. तसेच नागपुरसह विदर्भाला सोयामिल्कची सवय लावली. ते 76 वर्षाचे होते. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार पार पडला.

लाख-लाखोळीवरील बंदी विरोधातील चाळीस वर्षांच्या लढ्यात अन्न सत्याग्रहाचे जीवावर बेतणारे आंदोलन करण्याचे दोन डझनावर प्रसंग डॉ. शांतीलाल कोठारी यांच्या आयुष्यात आलेत. त्यापैकी 2015 मध्ये 86 दिवस चाललेल्या सत्याग्रहातून गांधीवादी कोठारींनी आपल्या निग्रहाचा परिचय करवून दिला होता. त्यांच्या आंदोलनाचा परिपाक म्हणून केंद्र सरकारला बंदी मागे घ्यावी लागली. देशातील बहुतेक राज्यांमध्ये पूर्वी लाख-लाखोळीचे उत्पादन घेतले जायचे. देशभरात ती तब्बल पंधरा विविध नावांनी ती ओळखली जाते. तथापि, या डाळीत काही विषाक्त घटक असल्याने तिच्या सेवनाने लाथॅरिझम नावाचा आजार होत असल्याच्या समजातून केंद्राने 1960 च्या आसपास या डाळीच्या उत्पादनांवर बंदी घातली. या बंदीची कठोर स्वरूपात अंमलबजावणी करताना अनेक राज्यांत उभी पिके पेटवून देण्याची कारवाई देखील त्यावेळी पोलिसांनी केली होती.

नागपुरातील ज्येष्ठ आहारतज्ज्ञ डॉ. शांतीलाल कोठारी यांनी संशोधन व देशभरात फिरून तयार केलेल्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून या बंदीच्या निर्णयाला आव्हान दिले. नियमितपणे डाळीचे सेवन करणाऱ्या कुणालाही हा आजार झाला नसल्याचा दावा त्यांनी शास्त्रीय पद्धतीने मांडला. मात्र, तो मान्य करण्यास सरकारने नकार दिल्याने डॉ. कोठारी यांनी 1989 मध्ये पहिल्यांदा लाखोळी बंदीच्या विरोधात अन्न सत्याग्रह केला. हृदय शस्त्रक्रियेनंतर 2007 मध्ये त्यांचे अन्नत्याग आंदोलन 86 दिवस चालले. या दिवसात प्यालाभर सोयामिल्क आणि गरम पाणी एवढाच आहार ते घ्यायचे. त्यांच्या चाळीस वर्षांच्या संघर्षातील किमान वर्षभराचा कालावधी तरी अन्नत्यागात गेला. सप्टेंबर 2015 मध्ये सुरू झालेले त्यांचे अन्नत्याग आंदोलन 57 दिवसांपर्यंत चालले. त्या नंतर केंद्र सरकारच्या फुड सेफ्टी अॅन्ड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाने लाखोळी डाळीवरील बंदी उठविण्यात आल्याचे त्यांना कळवले होते.


प्रामाणिक आणि ध्येयासक्त व्यक्तिमत्त्व : ना. गडकरी

सोयाबीन दुधाचे जनक आणि लाखोली डाळीसाठी संघर्ष करणारे आहारतज्ञ डॉ. शांतीलाल कोठारी यांच्या निधनाचे मला अतीव दुःख असून एक प्रामाणिक आणि ध्येयासक्त व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले, अशा भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

ना. गडकरी पुढे म्हणाले- तळागाळातील वर्गाला पोषक आहार मिळावा यासाठी डॉ कोठारी यांनी सतत प्रयत्न केलेत. लाखोली डाळ खुल्या बाजारात विक्रीला यावी म्हणून 40 वर्षे त्यांनी लढा दिला. नागपूरकरांना सोयमिल्कची सवय त्यांनीच लावली. ऍकेडमी ऑफ न्यूट्रिशन improvement या संस्थेच्या माध्यमातून योग्य आहाराबाबत त्यांनी दीर्घकाळ जनजागरण केले, असेही ना. गडकरी म्हणाले.


डॉ. शांतीलाल कोठारी यांच्या रुपाने विदर्भाने ‘कार्व्हर’ गमावला : डॉ. नितीन राऊत 

विदर्भातील विविध वनस्पतींवर व लाखोळी डाळीवर मूलभूत संशोधन करून त्या लोकोपयोगी असल्याचे सिद्ध करणारे थोर शास्त्रज्ञ डॉ. शांतीलाल कोठारी यांच्या निधनाने देश आणि विदर्भाने आधुनिक ‘जॉर्ज वाशिंग्टन कार्व्हर’ गमावला असल्याची शोकसंवेदना राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.
“अमेरिकेत एके काळी शेंगदाणा खाण्यावर बंदी होती. शेंगदाणे म्हणजे विष असे तेव्हा मानले जायचे. मात्र कार्व्हर यांनी सखोल संशोधन करून हा गैरसमज दूर केला. शेंगदाण्यापासून विविध पदार्थ तयार करून दाखविले. डॉ. कोठारी यांनीही याच पद्धतीने कार्य आणि संघर्ष केला. सोयमिल्क सारखे क्रांतिकारी संशोधन करून त्यांनी अन्न आणि आरोग्य क्षेत्रात सुवर्ण अक्षरात लिहावे असे काम केले,” असे डॉ. राऊत यांनी म्हटले आहे.


शेतकर्‍यांच्या हक्कासाठी लढणारा कार्यकर्ता हरपला : देवेंद्र फडणवीस

डॉ. शांतिलाल कोठारी यांच्या निधनाने शेतकर्‍यांच्या हक्कासाठी लढणारा एक खंदा कार्यकर्ता हरपला असल्याची शोकसंवेदना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. लाखोळीची डाळ असो की सोयाबीनची उत्पादनं, त्यांचे संपूर्ण आयुष्यच संशोधन आणि संघर्षाचे राहिले. कोणत्याही विषयाचा गाढा अभ्यास करून त्यासाठी संपूर्ण समर्पण भावनेने ते लढा देत असत. संघर्ष करताना त्यांची जिद्द आणि चिकाटी वाखणण्यासारखी होती. एकदा एखादा विषय त्यांनी हाती घेतला की मग त्यातून ते माघार घेणार नाहीत, हे सर्वांना ठावूक असायचे. नागपूरकरांसाठी ते सोयामिल्कचे संशोधक म्हणून सुद्धा सुप्रसिद्ध होते. विविध फ्लेवरयुक्त सोयामिल्क पिण्याची सवय त्यांनी नागरिकांना लावली. हे दूध आरोग्यदायी आहे, असे ते तास न् तास समजावून सांगत असत. मोहफुलांच्या पावडरचा चहा त्यांनी शोधून काढला. शेतकर्‍यांच्या विविध उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळावी आणि त्यातून अधिकचा पैसा शेतकर्‍यांना मिळावा, हाच त्यांचा सदोदित प्रयत्न असायचा. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदनेत म्हटले आहे.