नागपूर ब्युरो : ब्लाइंड रिलीफ असोसिएशन द्वारा संचालित मुंडले इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना 1998 मध्ये झाली. इंग्रजी भाषा ही काळाची गरज आहे आणि उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, नोकरी करिता देखिल इंग्रजीची आवश्यकता भासत असल्यामुळे ही इंग्लिश मीडियम स्कूल सुरु करण्यात आली. मुलांच्या सर्वांगीण विकासाकरिता आम्ही कटीबद्ध आहोत असे सकारात्मक विचार संस्थाध्यक्ष आणि शाळेचे संचालक मकरंद वसंतराव पांढरीपांडे यांनी “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” शी बोलताना मांडले.
नर्सरी व इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत ही शाळा असून एकूण 1350 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात दिव्यांग व अपंग विद्यार्थ्यांचा देखिल समावेश आहे. शाळेमध्ये शिक्षणासोबत क्रिडा, कला, संगीत, कौशल्यावर आधारित असे विविध उपक्रमदेखील सातत्याने राबविले जातात. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना सुसंस्कार, आपली नितिमूल्यांची जपणूक करून त्यांची जडण – घडण करण्याची सुद्धा शिकवण देण्यात येते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनेक राज्य स्तरीय स्पर्धांमध्ये पुरस्कार सुद्धा जिंकले आहेत.
कोविड -19 या महामारीच्या काळात देखिल आमच्या शिक्षकवृंदानी फार मोलाची कामगिरी बजावली. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शाळेला सुसज्ज अद्ययावत नेटवर्क सेवेशी जोडून विद्यार्थी व पालकांच्या अडचणी लक्षात घेऊन थेट शिकवणी वर्गाला विद्यार्थ्यांशी जोडले. शिवाय जिथे वेळेचे बंधन आणि नेटवर्कच्या समस्या आहेत तिथे आम्ही शिकवणीची रेकॉर्डिंग देखील पाठवतो. त्यामुळे विद्यार्थी आपल्या सोयीनुसार आपला परिपाठ पूर्ण करू शकतात. या काळात शिक्षणात खंड पडू नये म्हणून तातडीने सर्व शिक्षकांना स्मार्टफोन पुरविले आहे व त्यांचा इंटरनेटचा येणारा खर्च देखिल दिला जात आहे. दरवर्षी शाळेचा निकाल 100% लागतो हे विशेष.
कोरोना महामारी मुळे अनेक पालकांचे जॉब गेले, अनेकांचे उद्योग- धंधे बंद पडले, यामुळे शाळेने विद्यार्थ्यांचे 30 टक्के शुल्क माफ केले आहे. शाळेची जमेची बाजू ही आमची अद्ययावत लॅब आहे, असे ते म्हणाले.
शिक्षकांची पगार कपात नाही
कोरोना काळात मागील दोन वर्षापासून कोणत्याही शिक्षकांच्या पगारात कपात न करता किंवा कुणालाही कामावरून कमी न करता संस्थेने माणुसकी जपली. शिवाय कोणत्याही सकारात्मक कामासाठी संस्था नेहमी आमच्या पाठीशी असते असे उदगार मुख्याध्यापिका रुपाली हिंगवे आणि मेघा पाध्ये यांनी काढले. ऑनलाईन वर्गामुळे सुरुवातीला विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधतांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागले. कारण हा अनुभव दोहोंसाठी नवीनच होता. नंतर मात्र सगळं सुरळीत होत गेलं. कोरोनाने बरेचकाही शिकविले अशी प्रतिक्रिया देखील मुख्याध्यापिकेनी दिली.
शिक्षक आणि संस्था ही शाळेची दोन चाकं आहेत. दोघांमध्ये सामंजस्य आणि सहकार्य असल्याशिवाय कोणतीही शाळा सुचारू पद्धतीने चालूच शकत नाही. आम्ही नशीबवान आहोत की आम्हाला हे साधता आलं आणि आमचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, सहकारी अतिशय प्रामाणिक आणि शिस्तबद्ध, कर्तव्यदक्ष आहेत. मला खात्री आहे की यामुळे आम्ही भविष्यातदेखिल चांगले विद्यार्थी आणि उत्तम नागरिक या शाळेच्या माध्यमातून घडवू असे मनोगत पांढरीपांडे यांनी यावेळी व्यक्त केले.