मुंबई ब्युरो : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या अजेंड्यावर काम करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचं विधान केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे हे परप्रांतियांचा मुद्दा सोडून हिंदुत्वाच्या मार्गावर जाणार का? असा सवाल केला जात आहे.
राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी हे मोठं विधान केलं आहे. राज ठाकरे यांच्याशी भेट झाल्यावर परप्रांतियांचा मुद्दा आणि हिंदुत्व या दोन विषयावर त्यांच्याशी चर्चा झाली. यावेळी राज यांनी कोविडच्या दीड वर्षात माझी भूमिका मी जनतेपर्यंत पोहोचवू शकलो नाही. आता कोविड कमी झाला. मी हिंदुत्वाची जी लाईन पकडली होती ती अधिक तेज करेल, पण अन्य प्रांतियांच्याबाबत माझ्या मनात घृणा आणि द्वेष नाही, असं राज यांनी सांगितल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं.
त्यांच्या मताशी मी सहमत झालो
राज ठाकरे हे परप्रांतियांच्ंया विरोधात असल्याचं चित्रं आहे. हे चित्रं त्यांनी बदललं पाहिजे. त्यांनी भूमिका व्यापक करत नाही, तोपर्यंत थोडी मर्यादा राहील. त्यांनी भूमिका सांगितली. आता ती व्यवहारात आणली पाहिजे. ते तेवढं शक्य नाही. त्यांच्या मनात कुणाबद्दल कटुता नाही याबाबत मी कन्व्हिन्स झालो आहे. पण याचा निष्कर्ष असा नाही की उद्याच निवडणुकीवर चर्चा होईल आणि जागा वाटप होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.