पांजरा रीठी च्या गावकऱ्यांनी केली नुकसान भरपाई ची मागणी
नागपूर ब्युरो : मोहगाव (भ) लगत असलेल्या काटोल तालुक्यातील पांजरा रीठी या गावात अतिवृष्टीमुळे पाझर तलावाची भिंत फुटून शेतामध्ये पाणी घुसले. यात कमीत -कमी दोन हजार एकर शेतीतील पिकं वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. पुलावरील जाण्या-येण्याचे रस्ते सुद्धा यात विस्कळीत झाले असून अद्यापही शासकीय यंत्रणेने याची पाहणी केलेली नाही. गावकऱ्यांनी माजी पालकमंत्री बावांकुळे यांना निवेदन देऊन त्यांची समस्या दूर करण्याची मागणी केली आहे.
अतिवृष्टीमुळे पाझर तलावाची भिंत फुटून नदीकाठावरील सर्व शेतकऱ्यांची पिके वाहून गेल्यामुळे सदर शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई तसेच पुलावरील जाण्या-येण्याच्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी गावकऱ्यांच्या सदर समस्येची प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की सदर समस्या दूर करण्यासाठी शासकीय यंत्रणेला कामास लावले जाईल. पीडित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी संपूर्ण प्रयत्न केले जाईल.
बावनकुळे यांना निवेदन देणाऱ्यांमध्ये गादीलाल कामडी, आनंद डांगरा, राजू झाडे, उमाकांत ठाकरे, किरण कुमार धांडे, शंकरराव धांडे, शांताराम झाडे आदी गावकरी उपस्थित होते.