Home Vidarbha नितीन गडकरींची तंबी । तीन वर्षांत विदर्भातील दुग्धोत्पादन दुप्पट करा, नाहीतर…

नितीन गडकरींची तंबी । तीन वर्षांत विदर्भातील दुग्धोत्पादन दुप्पट करा, नाहीतर…

1187

नागपूर ब्युरो : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आपल्या सडेतोड वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. नागपुरात त्यांच्या याच स्वभावाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. विदर्भातील दुग्धोत्पादन दुप्पट करुन दाखवा. टार्गेट पूर्ण केलं तर गळ्यात फुलांची माळ पडेल, अन्यथा सक्तीची स्वेच्छानिवृत्ती दिली जाईल, अशा शब्दांत नितीन गडकरींनी पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापिठाचे शास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांना तंबी दिली आहे. नागपुरात पार पडलेल्या या कार्यक्रमाला राज्याचे पशूसंवर्धन मंत्री सुनील केदारही उपस्थित होते. आता नितीन गडकरींच्या वॉर्निंगनंतरही पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापिठाचे शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक कामाला लागणार का? हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.

येत्या तीन वर्षांत विदर्भातलं दुग्धोत्पादन दुप्पट करून दाखवा. त्यासाठी चांगल्या प्रतीच्या गाईंची शृंखला निर्माण करा, असे आवाहन नितीन गडकरींनी शास्त्रज्ञांना केलं. जर तुम्ही हे करून दाखवलं तर तुमचं सातवा वेतन आयोग आणि पदोन्नती होईलच, असं आश्‍वासन गडकरींनी यावेळी दिलं. पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, “जर विद्यापीठाचे तज्ज्ञ प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ हे करू शकले नाही. तर आधीच जनता ज्या विद्यापीठाला पांढरा हत्ती म्हणते, त्या पांढऱ्या हत्तीची आम्हाला गरज नाही.” असा असा इशाराही गडकरींनी यावेळी बोलताना दिलाय.

नितीन गडकरी येवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या नव्या रूग्णालयात वर्षाकाठी किती शस्त्रक्रिया करणार? किती प्राण्यांवर उपचार करणार? जास्त दूध देणाऱ्या किती गाई तयार करणार? याचा आकडाही सांगा, अशी विचारणाही केली. तुम्हीच निश्चित केलेलं टारगेट जर तुम्ही गाठू शकलात, तर तुमच्या गळ्यात फुलांची माळ टाकू, अन्यथा तुम्हाला सेवानिवृत्ती देऊ, असा इशाराही गडकरींनी यावेळी शास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांना दिला. आता गडकरींनी सर्वांसमोर परेड घेतल्यानंतर लोकांमध्ये आधीच पांढरा हत्ती अशी प्रतिमा झालेल्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक कामाला लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, नागपुरात महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या पशु रुग्णालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी नितीन गडकरी बोलत होते. राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री सुनील केदारही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.