नवी दिल्ली ब्युरो : नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात आलेल्या JEE MAIN 2021 च्या चौथ्या सत्राचा निकाल आज जाहीर होणार असल्याची माहिती आहे. जेईई मेन चौथ्या सत्राची परीक्षा 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2021 आयोजित करण्यात आली होती. जेईई मेन परीक्षेचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे. jeemain.nic.in आणि nta.ac.in या वेबसाईटवर निकाल जाहीर केला जाईल. निकालासोबत एनटीए जेईई मेन चौथ्या सत्राची अंतिम उत्तर तालिका, कट ऑफ आणि ऑल इंडिया रँकिंग देखील जाहीर करेल अशी माहिती आहे.
जेईई मेन 2021 सत्र 4 चा कसा पाहायचा?
- स्टेप 1: निकाल तपासण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर भेट द्या.
- स्टेप 2: वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- स्टेप 3: तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करून लॉगिन करा.
- स्टेप 4: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- स्टेप 5: निकाल डाऊनलोड करुन त्याची प्रिंट आऊट घ्या
नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणारी चौथ्या सत्राची जेईई मेन परीक्षा कोरोना संसर्गामुळं लांबणीवर टाकली गेली होती. देशातील 7.32 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. भारतातील 334 परीक्षा केंद्र आणि भारताबाहेरील 12 शहरांमध्ये ही परीक्षा 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरदरम्यान पार पडली. जेईई मेन परीक्षेतील टॉप अडीच लाख विद्यार्थी जेईई अॅडव्हान्सड परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी एक पेक्षा अधिक सत्राची परीक्षा दिली असेल त्यांचं सर्वाधिक गुण ग्राह्य धरली जातील.
जेईई अॅडव्हान्सड परीक्षेसाठी नोंदणी सुरु होणार
चौथ्या सत्राच्या निकालासोबत एनटीए ऑल इंडिया रँक आणि प्रवर्ग निहाय कट ऑफ लिस्ट जारी करेल. जेईई अॅडव्हान्सड परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. तिचा निकाल 15 ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. जेईई अॅडव्हान्सड परीक्षेसाठी नोंदणी जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुरु होईल. आज दुपारी जेईई अॅडव्हान्सड परीक्षेची नोंदणी सुरु होणार आहे. त्याअगोदर निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
इंग्रजी आणि हिंदी भाषेसह मातृभाषेत परीक्षा
नव्या शिक्षण धोरणानुसार जेईई मेन 2021 सत्राची परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेसह तेलुगू, तामिळ, पंजाबी, उर्दू, ओडिशा, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली, आमामी आणि गुजराती भाषेमध्ये घेतली जात आहे. आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी आणि इतर सरकारी अनुदानित तांत्रिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी समुपदेशन जेईई अॅडव्हान्सड एएटी परीक्षेच्या निकालानंतर सुरू होईल. जेईई मेन परीक्षा चौथ्या सत्राचा निकाल jeemain.nic.in आणि nta.ac.in या वेबसाईटवर निकाल जाहीर केला जाईल.
जेईई मेन परीक्षा
जेईई मेन ही राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा आहे. पदवीस्तरावरील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) JEE मुख्य परीक्षा आयोजित करते.